एप्रिल २२ - संत
मनुष्यजन्माला येणे , संतांची भेट होणे , आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे , या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत . म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात . सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय . काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात , मग मिळवायचे कुठे राहते ? संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते . एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते , कारण देहाला धरुन झालेल्या कर्माचे ते तेज असते ; पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही . आत वावरणार्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो . देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत , त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो . परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे , आणि देहाला विसरुन आणि देवाला स्मरुन जे मिळवायचे , असे भगवंताचे सुख आहे . ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे . विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे , हा संतसंगतीचा परिणाम . असा जो असेल तोच संत , नव्हे , प्रत्यक्ष भगवंत होय . अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी . संत आपल्याला सत्यस्वरुपाची ओळख करुन देतात . सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाचामनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय .
आगगाडीत बसणारी सर्व माणसे , मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत , इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसेदेखील , गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात ; त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात . त्यांच्यामधली बिनतिकिटाची , म्हणजे दुष्ट , पापी , दुराचारी , त्याज्य , आणि अयोग्य , अशी माणसेसुध्दा तरुन जातात ; मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये . हाच सत्संगतीचा महिमा . परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते . ही संगती तीन प्रकारची असते ; एक , संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास ; दोन , संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास ; आणि तीन , संताच्या विचारांची संगत . संगतीचा परिणाम नकळत होतो , म्हणून सत्संगती धरावी . आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले ; म्हणून त्यांना शरण जावे . संत स्वत : समाधान मिळवून ते दुसर्याला देतात , हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !