एप्रिल ३ - संत
धान्यामध्ये काही खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत . तांदळात पांढरे खडे असतात , ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत . त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात , त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात ; पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात . पुस्तकांतून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात . पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही . साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल , ते हे की , जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू . पण एवढ्यावरुन आपल्याला तो ओळखता येईल का ? नाही ; तर जेव्हा आपण साधू व्हावे , तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल .
जगात आपण कुणाचीच निंदा करु नये . आपण जेव्हा दुसर्याचे दोष पाहतो , म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात , त्या वेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रुपाने असतात असे समजावे ; आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन , ‘ हे माझे दुर्गुण काढून टाक ’, म्हणून त्याची करुणा भाकावी . आपण जेव्हा ‘ जगात न्याय उरला नाही ’ असे म्हणतो , त्या वेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे . म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत . आपण आपल्या स्वत : ला आधी सुधारावे . चित्तशुध्दी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवदभाव उत्पन्न होणार नाही . म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसर्याचे दोष दिसतात , तेव्हा आपलेच चित्त अशुध्द आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे , आणि ‘ माझे चित्त शुध्द कर ’ अशी त्याला विनंती करावी . असे केले म्हणजे आपले चित्त शुध्द होत जाते , आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही .
जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते ; उदाहरणार्थ , भाजणी . मिश्रण नसलेले एकच शुध्द अन्न पचायला सोपे असते . हे जसे खरे , त्याचप्रमाणे आपले अंत : करण अगदी शुध्द असावे , म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते . पण आपल्या अंत : करणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वामध्ये समरस होऊ शकत नाही . शुध्द अंत : करणाच्या माणसाचे चालणे हळू , आणि बोलणे मृदू असते . तो सर्वांना प्रिय होतो . जगातले आपले समाधान किंवा असमाधान , ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते . ‘ माझ्याकरिता मी नसून , मी लोकांकरिता आहे . माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे , ’ ही वृत्ती आपण ठेवावी .