Get it on Google Play
Download on the App Store

एप्रिल १४ - संत

प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते , हे ज्याप्रमाणे संसारात , तसेच परमार्थातही लागू आहे . संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो ; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी . चांगले - वाईट हे नेहमी आपल्यावरुनच ओळखावे . स्वत : ला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते . जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही . संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे . आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला , परंतु संतांनी आपल्याला जागे केले . चुकीची वाट चालत असताना , ‘ अरे , तू वाट चुकलास , ’ अशी जागृती संतांनी आपल्याला दिली . तेव्हा , जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन : चालू लागलो , तर आपण योग्य स्थळी जाऊ .

संत आनंदरुप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत . ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात . त्या वेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात . ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात . आपण धडपड करुन फुकट मरतो , त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात , हे केव्हाही चांगलेच होय . संत आनंदरुप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊ या . लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो , आणि तो हा की , ‘ जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या . ’ संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने , त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल ? प्रपंच हा दु : खमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे . तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो . त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे . आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही , तर त्या वाचनाचा उपयोग नाही . वाचनाचे मनन झाले पाहिजे . साधन व वाचन बरोबर चालावे .

ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही . ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला , अंगी विद्वत्ता नसताना देखील , त्या ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल . विद्वान हा कल्पनेने सत्यस्वरुपाचे वर्णन करतो , पण संत मात्र निश्चयाने , खात्रीने , आणि अनुभवाने ते रुप काय आहे हे सांगतात . सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणें वृत्ती बनवणें हा खरा सत्समागम आहे .