एप्रिल ४ - संत
आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक . ज्याला सर्व सृष्टी रामरुप दिसते , आणि शिष्यालाही जो रामरुप पाहतो , तोच खरा गुरु . सदगुरु कधीही मिंधेपणाने वागत नाही . आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो . आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते . देहबुध्दीचे लोक विषयाचे दास असतात , पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात . संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले , किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे . औषध काय आहे हे न कळतासुध्दा रोग्याने ते श्रध्देने घेतले तर त्याला गुण येतो , किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो . त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल , पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही .
मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दु :ख होत नाही , त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया , हाणामार्या , सज्जनांचा छळ , संकटे , यांचे संतांना वाईट वाटत नाही . ‘ वाईट वाटत नाही ’ याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे . पण मीठ जसे खारटच असणार , तशा जगात या घडामोडी होणारच , जगाची रहाटीच अशी आहे , हे समजून तो दु :ख करणार नाही . किंबहुना , मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही , तसे त्यालाही होईल . इतकेच नव्हे , तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो .
विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही . संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते , परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले . आपल्याला संत ‘ शोधण्याची ’ मुळीच जरुरी नाही . आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील . आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते . संत हा गुप्तपोलिसासारखा आहे ; तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो , पण आपल्याला ओळखता येत नाही . संताला स्वत :च्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते ; म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही . संताला कर्म मागेपुढे करता येते , पण ते टाळता येत नाही ; ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे . संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते . संत जो बोध सांगतात , त्याचे आपण थोडेतरी पालन करु या .