Android app on Google Play

 

एप्रिल ९ - संत

 

ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला ; आणि जे या सत्याला धरुन राहतात ते संत होत . संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात , परंतु आपला अभिमान आड येतो , आणि आपण संतांना नावे ठेवतो . एकजण संतांना उद्देशून म्हणाला , " तुम्ही आमचे नुकसान करता ; अपकार करणार्‍यावरही उपकार करायला सांगून आम्हांला मेषमात्र करता . " वास्तविक , आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे , पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे . ‘ राम कर्ता ’ या भावनेने त्यांनी कर्म केले ; आपण ‘ मी ’ पणाने करतो , म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते . संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही ; आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते , त्यामुळे ती पुरी पडत नाही !

एखादा पुष्कळ ज्ञानी झाला , पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग ? जगाचे खरे स्वरुप समजून घेण्यासाठी जो सुखदु :खाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे . तो साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो . कर्म करुनही तो अलिप्त राहतो . आपण मात्र सुखदु :खात गुरफटून जातो . संताचे अंत :करण शुध्द असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषासुध्दा न बोचणारी , किंबहुना आशीर्वादरुपच ठरते . सत्पुरुष काही विद्वान नसतात . अती विद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही . कुणी आठव्या वर्षीच घरातून निघून जातो , तर कुणी लग्नातून पळून जातो , तर कुणाला ,लिहायला -वाचायलाही येत नाही , असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात . संतांनी देह सोडल्यावर सुध्दा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते .

लहान मूल बाहेर खेळत असते , परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते . याचा अर्थ असा की , मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते . तसा भगवंताचा चटका , तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव , तशी त्याची निष्ठा , आपल्याजवळ पाहिजे . भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो . त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो . संत हे खरोखर आईसारखे आहेत . ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात . सर्व जगावर संतांचे उपकार आहेत . त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला ; परमात्म्याला आपलासा करुन घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले ; एकनाथी भागवत , ज्ञानेश्वरी , असे सोपे सदग्रंथ निर्माण केले ; आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले . या चार गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला , त्याला काही कमी पडणार नाही ; नेहमी समाधानच राहील .