Android app on Google Play

 

एप्रिल १३ - संत

 

संतांचे ज्ञानच असे असते की , त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते . अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला , केव्हा लिहिला , कुठे लिहिला , त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे , या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत , पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते . आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो ; त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणे कठीण आहे . बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दांत आणि स्वत : ला कळला असेल तसा सांगत असते , तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल . संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण , ज्यांना बुध्दीने खात्री करुन घ्यायची आहे त्यांनी ती करुन घ्यावी आणि परमार्थ करावा . संतांच्या वचनाचा ओढूनताणून अर्थ करु नये , त्याचा सरळ अर्थ घ्यावा . ग्रंथ वाचीत असताना आपली मते बाजूला ठेवावीत ; एक अक्षरावर दुसर अक्षर लिहिले , तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही , म्हणून शुध्द मनाने ग्रंथ वाचावा . आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर अन अक्षर वाचतो . तसे , ज्ञानेश्वरी , दासबोध , हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत . पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी , किंवा करमत नाही यासाठी , किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात . असे करणे योग्य नाही . खरे म्हणजे , संतांचे ग्रंथ वाचून स्वत : ला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात . ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात ; ‘ मोठ्या संताचा ग्रंथ आहे ’ म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात ; आणि त्याहीपेक्षा , ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात !

जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते . संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते . ते देहाला सावलीप्रमाणे मानतात . सावलीला दु : ख झाले म्हणजे केव्हाही अयोग्यच . म्हणूनच संतांच्या मनावर सुखदु : खाचा परिणाम होत नाही . संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक यांच्या नात्यागोत्याचेही नसतात . संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात , याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय . संत एकांतात जातात याचे कारण असे की , लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात . लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही ; पण एकांतात भेटणार्‍यांना लोकांतात भेटता येत नाही , म्हणून ते एकांतात जातात .