एप्रिल १७ - संत
आपण कोणतेही कृत्य करीत असताना , ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते , त्याप्रमाणे नाम घेताना , आपण कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी . ही जाणीव अखंड ठेवणे , मी भगवंताचा आहे हे जाणणे , याचे नाव अनुसंधान ठेवणे . वास्तविक आपण भगवंताचे आहोतच , पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले . संत ‘ तू विषयाचा नाहीस , भगवंताचा आहेस ’ असे सांगतात . हीच संतांची खरी कामगिरी , आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात . नाम घेणे म्हणजे ‘ मी विषयाचा नाही , भगवंताचा आहे , ’ असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे ; आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुन : पुन : मनाला तेच सांगणे , म्हणजे तेच नाम सतत घेणे .
तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता , पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार ? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे ; रामाला पक्के ओळखता आले पाहिजे . याकरिता अंत : करणाची पवित्रता पाहिजे ; शुध्द भाव पाहिजे . सर्व काही साधने केली , पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात . कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे , पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते . नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय . आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते .
ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरुर आहे . कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील , पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे . बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे . कोणत्याही परिस्थितीत , कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे . आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय .
अग्नीचा उपयोग तो करुन घेणार्यावर आहे ; तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो . परमेश्वराच्या ध्यानाने सिध्दी तर त्याज्य ; मग परमेश्वराचे ध्यान करुच नये की काय ? तर ध्यान हे सिध्दी मिळविण्याकरिता करु नये . परमेश्वर - प्राप्तीकरिता निष्कामबुध्दीने ध्यान करावे , म्हणजे परमेश्वर सिध्दीचे अडथळे दूर करतो . साधू सिध्दींचा उपयोग कधीही करीत नाहीत ; ते परमात्मस्वरुपात मिळून गेलेले असतात . सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते .