एप्रिल ५ - संत
जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते . ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात . ती सर्व विष शोषून घेते . नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते . त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते , आणि पुन : तो सत्पुरुष स्वत : शुध्दच राहतो . सत्संगती मिळेल , पण ती टिकणे फार कठीण काम आहे . साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो . मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो . विषयात दोष नाही ; म्हणजेच , नुसते विषय बाधक होत नाहीत , विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते . संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो . विषय मागूनही जो ते देत नाही , त्यांपासून परावृत्त करतो , तो संत . विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे , हा संतसंगतीचा परिणाम . ज्याची संगत केली असताना भगवत्प्रेम प्रकट होते तो संत जाणावा . अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी . विषयाची गोडी फार ; पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजनपूजन करणार्याची संगत धरावी . वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी . आपला सर्वाठायी भगवदभाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते . भगवंताच्या लीला पाहणार्यांनाच खरा आनंद मिळतो . म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात . ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा . तुकारामबुवा नुसते ‘ विठ्ठल विठ्ठल ’ म्हणत , पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही .
खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते , आपल्याला ती कळतही नाही . संत आपल्या हिताचे सांगतात , पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही . औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना ? मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुध्दा कुणाला लागणार नाही . अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे , कारण ‘ सर्व ठिकाणी मीच आहे ’ ही भावना झाल्यावर भयाचे कारण उरत नाही . आईपण जसे सगळीकडे सारखे , त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात . संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो ; पण त्यांचे करणे नि :संशय असते , तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो . डोळ्यांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात ; त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो . त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड , मऊ , हितकारक असते ; तसे आपण बोलावे .