Android app on Google Play

 

एप्रिल १९ - संत

 

एका गावात एक वैद्य राहात होता . त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरुन समजत असे . त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरुन जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले . वैद्याने त्या माणसाला सांगितले की , " तुला एक भारी रोग झाला आहे ; पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ , म्हणजे तुझा रोग बरा होईल . " वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात वैद्याचे काही नुकसान होते का ? त्याप्रमाणेच संतलोक जे आपल्याला करायला सांगतात , त्यात त्यांना स्वत : ला काही मिळवायचे असते का ? आपल्याला गुरु सांगत असतात , त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो . ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संतसंग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात . ते जे सांगतात ते स्वत : अनुभव घेऊनच सांगत असतात . औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल ? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की , नामस्मरणासारखे सोपे साधन नाही . तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे ? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे . ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही , तुमचेच नुकसान आहे ; तरी त्याचा विचार करा . आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे , म्हणजे निम्मे काम झाले . आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही . संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना , ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे . त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा , म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल .

एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली . तो म्हणाला , " भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो . " त्याला विचारले , " ते कसे ? " तेव्हा त्याने उत्तर दिले , " नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते . तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते ; मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही . म्हणजे आपलेपण बाजूला ठेवावे लागते . आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला . आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे . भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे , कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही . तो अत्यंत नि : स्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो . म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे . " याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे . हेच आपल्या जीविताचे सार आहे .