घामाची फुले 4
म्हणजे जो दमलेला नसेल, त्याची मैत्री देव करीत नाही. देव त्याचाच हात प्रेमानं हातात घेईल, ज्याचा हात काम करून दमलेला आहे, काही तरी जगात मंगल निर्माण करण्यासाठी दमलेला आहे. आळशाचा, ऐतखाऊचा देव मित्र नाही. समजलेत ना? आता कधी कामाचा कंटाळा करू नका. समजलं ना?'मतंग ऋषींनी प्रेमाने विचारले.
'होय गुरूजी. आम्ही काम करू. कोणतंही काम करावयास लाजणार नाही. श्रमणार्या लोकांना तुच्छ मानणार नाही. त्यांना मान देऊ, त्यांच्यामुळं दुनिया चालली आहे असं सदैव मनात बाळगून त्यांच्याविषयी कृतज्ञ राहू. ते आधी सुखात आहेत की नाही ते पाहू.' मुले मतंग ऋषींस म्हणाली.
'रामा, असा हया फुलांचा इतिहास आहे. ही फुले मेली नाहीत. नेहमी बारा महिने फुलतात. त्यांना कोणी पाणी घालो वा न घालो. ती सदैव टवटवीत, घवघवीत दिसतात. जणू तो घामाचा एक थेंब अनन्त काळपर्यंत त्यांस ओलावा देणार आहे. हया आश्रमात आता कोणी नाही. भगवान मतंग ऋषी निजधामास गेले; मग इथं कोण राहाणार? इथं ना आता विद्यार्थी, ना कोणी ऋषिमुनी. परंतु ही फुलं मुकेपणानं मतंग ऋषींचा महिमा जगाला सांगत आहेत. रामा, तुला देऊ का फुलं तोडून?'
'नको. त्या फुलांना मला वंदन करू दे. ती फुलं म्हणजे त्या महर्षींची तपस्या, त्या महर्षींची पुण्याई.' असे म्हणून रामाने त्या फुलांस प्रणाम केला. लक्ष्मणानेही केला. रामलक्ष्मण निघून गेले. फुलांचा सुवास त्यांच्याबरोबर जात होता. शबरीची भक्ती व मतंग ऋर्षींची पुण्याई त्यांच्याबरोबर जात होती.
गुरूजी थांबले. मुले बोलत नव्हती. सारे मुकाटयाने चालत होते.
'संपली का गोष्ट?' मधूने विचारले. 'संपली.' गुरूजी म्हणाले. 'मग कोणतं पाणी चांगलं?' मधूने विचारले. 'घामाचं पाणी.' लक्ष्मण म्हणाला.
'श्रीमंतांना तर सारखा घाम येतो. गादीवर लोळून घाम येतो. अंगावर खूप कपडे असल्यामुळं घाम येतो. कोणा कोणाच्या अंगात खूप वात असतो. त्यांना किती घाम येतो देव जाणे!' मधू म्हणाला.
'तो घाम नव्हे. ज्या घामातून काही तरी उपयोगी निर्माण होतं, सर्वांना लागणार्या वस्तू निर्माण होतात, धान्य, फुलं, फळं, घरं, दारं, कपडे, नाना संसारोपयोगी वस्तू निर्माण होतात, तो घाम पवित्र. प्रामाणिक श्रमांचा निढळाचा घाम. तो घाम ज्याच्या डोक्यातून, ज्याच्या अंगातून निघतो, तो पवित्र; तो पूज्य; तो युक्त; तो खरा मनुष्य; परंतु आज त्यांचीच दैना आहे. तुम्ही त्या श्रमणार्यांची उद्या मोठे झालेत म्हणजे बाजू घ्या. त्यांचे संसार सुखाचे करा.' गुरूजी म्हणाले.