बासरीवाला 3
एके दिवशी लिलीचा बाप बाहेरगावी गेला होता. आईला विचारून लिली मन्याकडे जावयास निघाली. तिने खाऊचा डबा बरोबर घेतला होता. नदी सागराकडे निघाली. कोकिळा वसंताकडे निघाली. मधमाशी फुलाकडे निघाली. मन्या पाठमोरा बसला होता. त्याच्या हातात बासरी होती. नदीच्या प्रवाहाकडे तो बघत होता. एकदम पाठीमागून जाऊन लिलीने त्याचे डोळे धरले, 'कोण आलं इथं छळायला? कोण धरतंय माझे डोळे? मन्या त्वेषाने म्हणाला व ते कोमल हात त्याने कुस्करले. लिली भ्याली व हरणीसारखी ती पळून गेली. गोड मन्याची आज तिला भीती वाटली.
मन्या पाठीमागे वळून पाहतो, तो लिली परत जात आहे असे त्याला दिसले. 'लिल्ले, लिल्ले' त्याने हाका मारल्या. ती परतली नाही. मन्या खिन्ना झाला. त्याला वाईट वाटले. त्याला वाटले की पळत जावे व लिलीला आणावे. आपण तिला बासरी वाजवून दाखवू. तिच्याजवळ गोष्टी बोलू; परंतु त्याला धैर्य झाले नाही.
काही दिवस गेले. मन्याने हाका मारल्या तरी आपण गेलो नाही ह्याचे आता तिला वाईट वाटत होते. तिचा राग गेला. प्रेम का कधी रागावते? तिने पुन्हा एक संधी साधली. मन्यासाठी तिने खाऊ घेतला. ती निघाली. मन्या अलिकडे पाठमोरा बसत नसे. गावाकडे तोंड करून बसे व नदीकडे पाठ करी. लिली आली तर दिसावी म्हणून तो असे करी. लिली येताच त्याला दिसली. तो आनंदाला. प्रेम परत आले, मैत्री परत आली.
तो म्हणाला, 'लिल्ये, त्या दिवशी अगदी फणका-यांन निघून गेलीस ना? मी किती तुला हाका मारल्या.'
लिली म्हणाली, 'तू माझ्यावर एकदम ओरडलास. मी घाबरले.'
मन्या म्हणाला, 'तू धरलं आहेस हे मला काय माहीत?'
लिली म्हणाली, 'लपंडावाच्या खेळात तुझे डोळे ह्याच हातांनी मी पूर्वी झाकीत असे. ते हात तू कसे ओळखले नाहीस?'
मन्या म्हणाला, 'परंतु अलिकडे कितीतरी दिवसांत आपण खेळलो नाही. शिवाय मी त्या वेळेस दु:खी होतो, त्रासलेला होतो. तुझ्या प्रेमाला माझे दोन शब्दही सहन झाले नाहीत? एका शब्दाने मैत्री मोडते? परंतु असली दुबळी मैत्री काय करायची? किती आघात झाले तरी ती अभंग राहावी, ती काचेसारखी नसावी, हिर्यासारखी असावी.'