Get it on Google Play
Download on the App Store

ज्याचा भाव त्याचा देव 1

गोष्ट फार जुनी. त्या वेळेस आजच्यासारखी स्थिती नव्हती. प्रत्येक गाव सुखी होता, समृध्द होता, सर्वांना उद्योग होते. गावात कुंभार मडकी घडवी, चांभार जोडे शिवी; विणकर विणी, लोंढारी लोंढी; पिंजारी पिंजी, रंगारी रंगवी; तेल्याचा घाणा चाले, बुरुडाचे टोपल्या-रोवळयांचे काम चाले. लोक फावल्या वेळेत सूत कातीत. गावात नसे भांडण, नसे तंटा. काही कलागत झालीच तर गावातील गावसईत त्याचा निकाल लागे, तो निकाल सारे मान्य करीत. नव्हती कोर्टे, नव्हत्या कचेर्‍या; नव्हते वकील, नव्हत्या तारखा; नव्हते भत्ते, नव्हते अवाढव्य खर्च, रामराज्यच होते म्हणा ना.

साधारण प्रत्येक गावात त्या काळी शाळा असे. शाळेत एक पंतोजी असे. पंतोजीला गावात फार मान असे. दिवसा तो मुलांस शिकवी. रात्री महाभारत, भागवत लोकांना वाचून दाखवी, कोठे तंटा झाला तर पंतोजी मिटवावयाला असावयाचा. पंतोजी सार्‍या गावाचाच जणू शिक्षक असे. पंतोजीला पगारबिगार नसे. लोक त्याला राहावयास घर देत, खावयाला धान्य देत. कोणी भाजी आणून देई, कोणी पानफुले आणून देई. पंतोजी सर्वांचा. त्याचे काही नसून सारे त्याचे होते. त्याला कशाची वाण नसे. त्याच्या घरी लग्न-मुंज किंवा काही समारंभ वगैरे असले तर सारा गाव ते कार्य आपलेच समजून पार पाडी.

त्या गावाचे नाव होते सोनगाव. खरोखरच सोन्यासारखा होता गाव. स्वच्छ हवा, मुबलक पाणी. बारा महिने नदी वाहात असे. नदी म्हणजे गावाची कळा, गावाचे वैभव. ज्या गावाला नदी, तेथे दैन्य नाही कधी - अशी म्हणच आहे.

सोनगावच्या पंतोजीचे नाव रामभाऊ. रामभाऊंचे वय फार नव्हते. तिशीच्या आत-बाहेर. मोठे धार्मिक, कर्मिष्ठ; मोठया पहाटे उठावयाचे, नदीवर जाऊन स्नान करून यावयाचे. संध्या-नमस्कार करून शाळेत जावयाचे. प्रहरभर दिवस येईपर्यंत सकाळची शाळा चाले. मग सुट्टी होई. दुपारी जेवण झाल्यावर रामभाऊ नियमाने सूत कातावयाचे. स्वत:च्या धोतरे-उपरण्यासाठी व पत्नीच्या बाडासाठी तेच सूत कातीत. पतीच्या हातच्या सुताचे लुगडे नेसताना पत्नीला धन्य वाटे. तिच्या हातचा स्वयंपाक चाखताना पतीला कृतार्थ वाटे. सूत कातून झाल्यावर ते थोडे वाचीत. नंतर पुन्हा शाळा. गाई घरी येईपर्यंत शाळा चाले. मग मुलांना घेऊन ते नदीकाठी जात. त्यांच्याबरोबर, हुतुतू, हमामा खेळत, रंगत. अंधार पडू लागला की मुले घरी जात. रामभाऊ नदीवर हात-पाय धुवीत व तेथेच संध्या करीत. नंतर घरी येऊन भोजन करीत. रात्री देवळात रामविजय, हरिविजय, शिवलीलामृत -कोणती तरी पोथी वाचीत. असा रामभाऊंचा जीवनक्रम होता.



घामाची फुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वर्गातील माळ 1 स्वर्गातील माळ 2 स्वर्गातील माळ 3 स्वर्गातील माळ 4 स्वर्गातील माळ 5 स्वर्गातील माळ 6 स्वर्गातील माळ 7 स्वर्गातील माळ 8 स्वर्गातील माळ 9 जाई 1 जाई 2 जाई 3 जाई 4 जाई 5 जाई 6 जाई 7 जाई 8 जाई 9 जाई 10 जाई 11 बासरीवाला 1 बासरीवाला 2 बासरीवाला 3 बासरीवाला 4 बासरीवाला 5 बासरीवाला 6 बासरीवाला 7 अश्रूंचे तळे 1 अश्रूंचे तळे 2 अश्रूंचे तळे 3 अश्रूंचे तळे 4 अश्रूंचे तळे 5 ज्याचा भाव त्याचा देव 1 ज्याचा भाव त्याचा देव 2 ज्याचा भाव त्याचा देव 3 ज्याचा भाव त्याचा देव 4 ज्याचा भाव त्याचा देव 5 ज्याचा भाव त्याचा देव 6 ज्याचा भाव त्याचा देव 7 थोर त्याग 1 थोर त्याग 2 थोर त्याग 3 थोर त्याग 4 थोर त्याग 5 मातृभक्ती 1 मातृभक्ती 2 मातृभक्ती 3 मातृभक्ती 4 मातृभक्ती 5 मातृभक्ती 6 मातृभक्ती 7 बहुला गाय 1 बहुला गाय 2 बहुला गाय 3 बहुला गाय 4 बहुला गाय 5 बहुला गाय 6 घामाची फुले 1 घामाची फुले 2 घामाची फुले 3 घामाची फुले 4