मातृभक्ती 5
पुष्कळ वर्षांनी वामन व हरी घरी येणार होते. एक बाई व एक गडी कामाला लावून ठेवण्याबद्दल त्यांनी गोपाळला आधी कळविले होते. गोपळला आनंद झाला होता. भावांच्या स्वागताची त्याने तयारी करून ठेवली होती. दोघे भाऊ बायका-मंडळींसह मुले-बाळे घेऊन घरी आले. आईला आनंद झाला. सुनांनी तिला नमस्कारही केला नाही. नातवांना मात्र आजी आवडू लागली. आजी त्यांना गोष्टी सांगे, अंगावर नाचू देई. मुलांना आजीचा लळा लागला.
वामन व हरी येऊन फार दिवस झाले नाहीत, तोच त्या गावात तापाची साथ आली. बायका म्हणू लागल्या, 'चला येथून लवकर.' हरी व वामन एकदम जाण्याची तयारी करून लागले. गोपाळ आपल्या भावांना म्हणाला, 'आईलाही घेऊन जा चार दिवस. तिला थोडा थारेपालट होईल. सारा जन्म हया गावात तिनं काढला, कंटाळली आहे. जा घेऊन. नाशिक-पंढरपूर दाखवा. जरा हिंडवा. आणि येथे साथही आली आहे; आई आजारी वगैरे पडली तर शुश्रूषा करणं कठीण जाईल. मोठया शहरात सोयी असतात.' वामन व हरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहात होते. शेवटी हरी म्हणाला, 'आईला न्यावयाला हरकत नाही. परंतु आईचं ते सोवळं-ओवळं, तिचा देव-देव हे फार असतं. मुलं तिला शिवतील, त्रास देतील. तिलाच वाटेल की कोठून इकडे आल्ये.' वामन म्हणाला, 'आणि गोपाळ, एकटया आईचंही तुझ्यानं होत नाही का रे? तुला कोणाचीच जबाबदारी नको आहे. मुलाबाळांचं, सर्वांच करता करता आम्हाला कोण यातायात होते, आणि तुला एक आईही जड झाली? गोपाळ म्हणाला, 'जड नाही रे. आईची सेवा करण्यात मला आनंद आहे; परंतु तिला येथे राहून राहून कंटाळा आला असेल म्हणून म्हटलं. आहात तुम्ही तिचे दोन मुलगे चांगले रोजगारी, म्हणून सांगितलं. अपाण कुठं जावं असं तिच्या नसेल का रे मनात येत? हरी म्हणाला, 'तिच्या मनाता काहीसुध्दा येत नसेल. ती हरी हरी म्हणत बसत असेल. तूच तिच्या मनात भल-भलतं भरवीत असशील. तुला इतर बुध्दी नाही, परंतु ही लावालावीची आहे वाटतं.'
गोपाळच्या डोळयांना पाणी आले. ही बोलणी आई ऐकतच होती. आई तेथे आली व म्हणाली, 'गोपाळ, मी येथेच आहे ती बरी आहे हो. तुला तरी येथे कोण आहे? आणि अरे, साथ नि बीथ. आम्हा म्हातार्यांना काहीसुध्दा व्हायचं नाही. तरणी-ताठी पटकन जायची. माझी नको हो काळजी.' वामन, हरी निघाले. दारात गाडया आल्या. सामान भरण्यात आले. नमस्कार करून वामन व हरी गाडीत जाऊन बसले. सुनांनी 'येतो म्हणूनसुध्दा सांगितले नाही, मग नमस्कार करावयाचे तर दूरच राहिले. त्या आपली मुले-बाळे घेऊन निघाल्या; परंतु नातवंडे 'आजी, आजी' करू लागली. आजीने घ्यावे म्हणून ती रडू लागली. हात पुढे करू लागली. प्रेमळ आजीचा त्यांना लळा लागला होता; परंतु आयांना ते बघवले नाही. त्यांना त्या मुलांचा राग आला.
'आजी-आजी-काय आहे? गप्प बसता की नाही? दोन दिवस नाही आली तर काटर्यांना आजी गोड वाटू लागली.' असे म्हणून त्यांनी आपापल्या मुलांचे हात कुस्करले, गालगुचे घेतले. म्हातारीला वाईट वाटले, 'नका ग बोलू--नका ग मारू. मी थोडीच त्यांना येथे ठेवणार आहे? असे ती म्हणाली.