बासरीवाला 2
एके दिवशी धोंडोपंत मन्याला म्हणाले, 'मन्या बाळ! जमाखर्चापुरतं तरी शीक. आपल्या मुनिमांजवळ बसत जा. व्यवहार पाहात जा. ह्या सर्व इस्टेटीचा मालक तू व्हायचा आहेस. हे सारं सोन्या, तुझ्यासाठी आहे.' वडिलांचे शब्द ऐकून मन्या म्हणाला, 'बाबा! मला काही नको. ही इस्टेट आपली थोडीच आहे?' वडील म्हणाले, 'आपली नाही तर कोणाची? माझ्या अक्कलहुषारीनं ती मी मिळवली आहे,' वडील पुढे म्हणाले. 'कर्ज घेताना नाही कधी रडत! कर्ज काढावं कशाला? लोकांना घ्यायला पाहिजे. द्यायला नको.'
मन्याची बालमैत्रीण होती. तिचे नाव लिली. ती शेजारीच राहात असे. लिलींचा बाप गरीब होता. धोंडोपंताचा तो देणेकरी होता. मन्या व लिली एके ठिकाणी खेळत. लिली त्याला लटुपटीचे जेवायला वाढायची. दोघे झोपाळयावर बसत व मोठयाने झोके घेत. दोघांची फार गट्टी होती. मन्याला लिलीशिवाय व लिलीला मन्याशिवाय करमत नसे.
परंतु मन्या लिलीकडे जात नसे. तो कोठेच जात नसे. नदीच्या तीरी जाऊन तेथल्या वटवृक्षाखाली तो बासरी वाजवीत बसे. मन्या फारच छान बासरी वाजवी. जणू गोकुळातील कृष्णच मुरली वाजवीत आहे असे वाटे. मन्याची बासरी ऐकून गाईगुरे तटस्थ राहात, पक्षी झाडावर गप्प बसत. नदीचे पाणी पांगुळे व वाहतनासं होई. वारा स्तब्ध होई. पाषाणाला पाझर फुटे. गरिबांची दु:खे का त्या बासरीतून आळवी? जगातील हायहाय का तो त्या सुरांतून प्रगट करी?
सकाळपासून संध्याकाळपर्यंत मन्या त्या झाडाखाली बसे. रानातील गुराखी त्याचे मित्र बनले. ते त्याला कांदा भाकर देत व नदी त्याला स्वच्छ पाणी देई. कधी-कधी पक्षी चोचींतून फळे आणून त्याच्या पायांजवळ ठेवीत, तर कधी त्याच्यासमोर येऊन गाई दुधाच्या धारा सोडीत. मन्या गाईचा वत्स होई व ते दूध पिई. मन्या सृष्टीचा बालक झाला होता. प्रेमळ मन्यावर सारी सृष्टी प्रेम करीत होती.
बरेच दिवसांत लिलीला मन्या भेटला नव्हता. मन्याला भेटावयाला ती अधीर झाली होती. आई रोज तिला खाऊ देई; परंतु तो तिने न खाता तसाच सारा जमवून ठेवला होता. मन्या व मी दोघे मिळून खाऊ असे ती मनात म्हणे. मन्या आज येईल, उद्या येईल अशी ती वाट पाहात होती. मन्या आला नाही.
मन्याच्या बापाने लिलीच्या बापाला ताकीद दिली होती की, 'खबरदार लिली मन्याकडे गेली तर. त्या कारटयाला एकटा राहू दे, म्हणजे शेवटी कंटाळून घरी येईल.' लिलीचा बाप देणेकरी होता, म्हणजेच गुलाम व मिंधा होता. त्याने लिलीला तसे बजाविले. तिच्या डोळयांत पाणी आले. ऋणी बापाला ते दिसले नाही, दिसले तरी रुचले नाही, पटले नाही.