Get it on Google Play
Download on the App Store

बहुला गाय 2

असा तो डुबा. परन्तु आज त्याची आई कोठे आहे? आज त्याला पान्हा कोण पाजणार? त्याचे अंग प्रेमाने कोण चाटणार? डुबा एकसारखा हंबरत होता; परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही. डुबा कावराबावरा झाला. केविलवाणा दिसू लागला.

सायंकाळी बहुला भानावर आली. आपण घोर रानात आहोत हे तिला कळले. तिला यमुना दिसेना, कृष्ण दिसेना, गाई, गोप दिसेनात. कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना. बहुला घाबरली. तिला रस्ता दिसेना. सर्वत्र घोर रान माजलेले होते. रानकिडयांचा किर्र आवाज होत होता. अरण्यातील श्वापदांचे भयंकर गदारोळ तिच्या कानी पडत होते. बहुला भगवंताचा धावा करू लागली. 'देवा, तुला सोडून मी आज कशी रे गेल्ये? तू मला का धरून ठेवलं नाहीस? तुझी मुरली मला का ऐकू आली नाही? हिरव्या हिरव्या गवताला भुलून मी तुला सोडून गेल्ये. मीच पापी आहे, लोभी आहे देवा. कृष्णा, ये. मला भेट. मला थोपट. पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही.'

इतक्यात काय चमत्कार झाला, झाडीत सळसळ आवाज झाला. बहुलेला वाटले, कृष्णाच्या पीतांबराचाच आवाज. ती आशेने पाहू लागली. ते पाहा दोन हिरे, का तारे? कृष्णाच्या मुगुटावरचे का ते हिरे? छे! ते हिरे नव्हते, ते तारे नव्हते. ते वाघाचे डोळे होते. अरे बाप रे! केवढा प्रचंड वाघ. तो वाघ गुरगुरत बाहेर आला. तो वाघ जिभल्या चाटीत होता. गाईला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते.

वाघ पाहून बहुला घाबरली. वाघ बहुलेवर आता उडी मारणार, तिच्या मानेचा घोट घेणार, तोच बहुला करूणवाणीने त्याला म्हणाली, 'वाघोबा, मी तुझ्या तावडीत सापडल्ये खरी. तू मला खा. मी जीवदान मागत नाही, कारण मरणाचं भय मला वाटत नाही. कृष्णाच्या भक्ताला मरणाची डर वाटत नसते; परंतु एक मागणं तुला मागते. माझा बाळ डुबा घरी वाट पाहात असेल. तो हंबरत असेल. त्याला शेवटचा पान्हा पाजून, त्याला निरोप देऊन मी येते. मी खचित येईन.'

वाघ म्हणाला, 'एकदा निसटून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील? मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्याइतकी मूर्ख तू खचित नसशील. हातातील शिकार भोळेपणाने सोडून देण्याइतका मूर्ख मीही नाही. चल, मी तुला मारणार व खाणार. तुझं काही मांस माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिलांना नेऊन देणार. माझी वाघीण वाट पाहत असेल.'

बहुला म्हणाली, 'वाघोबा, तुलाही मुलंबाळं आहेत. मुलांची माया तू जाणतोस. माझ्या मुलाची तुला दया येऊ दे, मी खरंच परत येईन, मी कृष्णदेवाची सखी आहे. मी दिला शब्द पाळीन. सूर्य वरून पडेल, पृथ्वी उडेल, सागर कोरडे होतील, अग्नी थंड होईल; परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही. माझी परीक्षा तर घेऊन पाहा. वाघोबा, दाखव, जवळचा रस्ता दाखव. मी आत्ता जाऊन येते.'

घामाची फुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वर्गातील माळ 1 स्वर्गातील माळ 2 स्वर्गातील माळ 3 स्वर्गातील माळ 4 स्वर्गातील माळ 5 स्वर्गातील माळ 6 स्वर्गातील माळ 7 स्वर्गातील माळ 8 स्वर्गातील माळ 9 जाई 1 जाई 2 जाई 3 जाई 4 जाई 5 जाई 6 जाई 7 जाई 8 जाई 9 जाई 10 जाई 11 बासरीवाला 1 बासरीवाला 2 बासरीवाला 3 बासरीवाला 4 बासरीवाला 5 बासरीवाला 6 बासरीवाला 7 अश्रूंचे तळे 1 अश्रूंचे तळे 2 अश्रूंचे तळे 3 अश्रूंचे तळे 4 अश्रूंचे तळे 5 ज्याचा भाव त्याचा देव 1 ज्याचा भाव त्याचा देव 2 ज्याचा भाव त्याचा देव 3 ज्याचा भाव त्याचा देव 4 ज्याचा भाव त्याचा देव 5 ज्याचा भाव त्याचा देव 6 ज्याचा भाव त्याचा देव 7 थोर त्याग 1 थोर त्याग 2 थोर त्याग 3 थोर त्याग 4 थोर त्याग 5 मातृभक्ती 1 मातृभक्ती 2 मातृभक्ती 3 मातृभक्ती 4 मातृभक्ती 5 मातृभक्ती 6 मातृभक्ती 7 बहुला गाय 1 बहुला गाय 2 बहुला गाय 3 बहुला गाय 4 बहुला गाय 5 बहुला गाय 6 घामाची फुले 1 घामाची फुले 2 घामाची फुले 3 घामाची फुले 4