ज्याचा भाव त्याचा देव 4
गोपाळ शाळेत गेला. तेथील पंतोजींनी त्याची चौकशी केली. रामभाऊंचा मुलगा हे कळल्यावर त्यांनी त्याची पाठ थोपटली व ते म्हणाले. 'येत जा हं बाळ. हुशार हो. वडिलांची कीर्ती पुन्हा तू मिळव.'
गोपाळ घरी आला. आईने विचारले, 'गोपाळ! कशी आहे शाळा?' गोपाळ म्हणाला, 'फार चांगली. पंतोजी चांगले आहेत. त्यांनी पाठीवरून हात फिरविला व ते म्हणाले' 'चांगला हो. हुशार हो.'
सायंकाळ झाली. सीताबाई गोपाळचा परवचा घेत होत्या. त्याला रामरक्षा वगैंरे स्तोत्रे शिकवीत होत्या. जेवण करून गोपाळ झोपी गेला. सीताबाई माळ घेऊन जप करीत बसल्या. रूद्राक्षांची माळ. ती त्यांच्या पतीच्या जपाची होती. एखादे वेळेस माळ जपता-जपता सीताबाईंच्या डोळयांतील आसवांची माळही सुरू होई.
एक-दोन दिवस गेले. एके दिवशी गोपाळ म्हणाला, 'आई, मी नाही जात शाळेत.' आईने विचारले, 'का रे बाळ? असं नये करू. शिकलं पाहिजे. विद्या मिळवली पाहिजे.' गोपाळ म्हणाला, 'नाही. मी जायचा नाही.' ती माउली म्हणाली, 'असा हट्ट नये करू गोपाळ. गरिबाला हट्ट करून कसं चालेल? का जात नाही ते तर सांग.' गोपाळ म्हणाला, 'मला सायंकाळी परत येताना त्या जंगलाजवळ भीती वाटते. इतर मुलं मोठी आहेत. ती पळत पुढं निघून येतात. मी एकटाचं मागं राहातो. मला भय वाटतं. नको मला पाठवू शाळेत.'
गोपाळच्या आईने देवावर भरवसा ठेवला. ती म्हणाली, 'गोपाळ, तिथं रे कसली भीती? त्या जंगलात तर तुझा दादा राहातो. त्याला हाक मार. तो येईल.' काय, माझा दादा राहातो तेथे? मला दादा आहे? इतके दिवस तू का नाही सांगितलंस? दादा घरी ग का नाही येत?' असे गोपाळने उत्सुकतेने विचारले. सीताबाई म्हणाली, 'दादाला फार काम असतं. त्याला यायला वेळ नसतो. त्याचा धनी रागीट आहे. जा तू हाक मार. थोडा वेळ तो तुझ्यासाठी येईल, जा बाळ.'
गोपाळ निघाला. तो पळतच निघाला. केव्हा एकदा दादा पाहीन असे त्याला झाले होते. तो त्या जंगलाजवळ आला. त्याने 'दादा-दादा' अशी हाक मारली. दादा येतो का गोपाळ बघत होता. तो काय आश्चर्य!