Get it on Google Play
Download on the App Store

स्वर्गातील माळ 6

'मी एक अनाथ मुलगा आहे. मला आई ना बाप; बहिण ना भाऊ. मी एकटा आहे. या जगात मी एकटा आहे. भटकत भटकत या गावी आलो. म्हटलं, दिवाळीच्या दिवशी ओमोदे गावी जावं. लोक तिथं देणग्या देत आहेत. आपणासही काही मिळेल; परंतु पोटात काही नसल्यामुळं गावात येईतो अंधार पडला. मुसळधार पाऊस पडू लागला. मला रस्ता सापडेना. काटे बोचले, दगडांवर ठेचा लागल्या. मी सारा भिजून गेलो आहे. मी गारठून गेलो आहे. पोटात काही नाही. मी दमून गेलो आहे. एक पाऊल टाकणंही कठीण. मला घेता का घरात? मला मानता का भाऊ? माझी होता का बहीण? येते का गरिबाची दया? करता का माझी कीव?' तो अनाथ मुलगा कसे पण बोलत होता!

सखूचे हृदय विरघळले. 'ये हो बाळ, ये', असे ती म्हणाली. त्याचा हात धरून ती त्याला घरात घेऊन आली. त्या तिन्ही बहिणींनी पाहिले, तो आई नाही, बाबा नाहीत. समोर एक भिकारडा पोरगा!
मणकी म्हणाली, 'सखू, कोणाचा हा मुलगा? असेल कोणी भामटा! त्याला का घरात घ्यायचं?'

हिरी म्हणाली, 'भिकारडा आहे. अंगावर नाही धड चिंधी, पाय चिखलात बरबटलेले. घाणेरडे पाय घरात आणलेन.'

रुपी म्हणाली, 'जा रे पोरा, तुला लाज नाही वाटत?'

सखू म्हणाली, 'ये हो बाळ. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊं नकोस. चल, तुला कढत पाणी देत्ये. अंगाला तेल लावत्ये. नीट अंघोळ कर. मग पोटभर फराळ कर. आज दिवाळी. मी एकटी आहे. देवानं मला भाऊ दिला.'

सखूने त्याच्या अंगाला तेल लावले. त्याला कढत पाणी दिले. त्याचे अंग पुसले. एका केळीच्या पानावर त्याला फराळाचे वाढले.

माणकी म्हणाली, 'सखू त्याला स्वयंपाकघरात कुठं आणलंस? सारं घर बाटवलंस! कोणाचा मुलगा आहे देव जाणे!'

हिरी म्हणाली, 'सखू, तू माजलीस होय? म्हणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ! थांब, आईला येऊ दे, म्हणजे तुला काढून टाकायला सांगत्ये.'

घामाची फुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वर्गातील माळ 1 स्वर्गातील माळ 2 स्वर्गातील माळ 3 स्वर्गातील माळ 4 स्वर्गातील माळ 5 स्वर्गातील माळ 6 स्वर्गातील माळ 7 स्वर्गातील माळ 8 स्वर्गातील माळ 9 जाई 1 जाई 2 जाई 3 जाई 4 जाई 5 जाई 6 जाई 7 जाई 8 जाई 9 जाई 10 जाई 11 बासरीवाला 1 बासरीवाला 2 बासरीवाला 3 बासरीवाला 4 बासरीवाला 5 बासरीवाला 6 बासरीवाला 7 अश्रूंचे तळे 1 अश्रूंचे तळे 2 अश्रूंचे तळे 3 अश्रूंचे तळे 4 अश्रूंचे तळे 5 ज्याचा भाव त्याचा देव 1 ज्याचा भाव त्याचा देव 2 ज्याचा भाव त्याचा देव 3 ज्याचा भाव त्याचा देव 4 ज्याचा भाव त्याचा देव 5 ज्याचा भाव त्याचा देव 6 ज्याचा भाव त्याचा देव 7 थोर त्याग 1 थोर त्याग 2 थोर त्याग 3 थोर त्याग 4 थोर त्याग 5 मातृभक्ती 1 मातृभक्ती 2 मातृभक्ती 3 मातृभक्ती 4 मातृभक्ती 5 मातृभक्ती 6 मातृभक्ती 7 बहुला गाय 1 बहुला गाय 2 बहुला गाय 3 बहुला गाय 4 बहुला गाय 5 बहुला गाय 6 घामाची फुले 1 घामाची फुले 2 घामाची फुले 3 घामाची फुले 4