जाई 2
मोहन व जाई दोघे वाढत होती. दोघे देखणी होती. रामजी आपल्या मनात एक मनोरथ मांडीत होता. तो आपल्या मनात एक गोड स्वन्प रचीत होता. पुढेमागे मोहन व जाई यांचे लग्न लावून द्यावे, छान आहे जोडा, असे त्याच्या मनात येई. आपल्या मृत मित्रासही ह्यामुळे स्वर्गात आनंद होईल असे त्याला वाटे.
दिवसांपाठीमागून दिवस जात होते. महिन्यांमागून महिने जात होते. वर्षामागून वर्षं जात होती. मोहन व जाई बहिण-भावाप्रमाणे वाढत होती, निर्मळपणे वाढत होती, निष्पाप वृत्तीने वाढत होती. रामजीची इच्छा त्यांना काय माहीत? रामजीचे गोड स्वन्प त्यांना काय ठाऊक? रामजीने कधीही तशी शंका त्या मुलांना येऊ दिली नव्हती.
आता मोहन विशीच्या पलीकडे गेला. तो चांगलाच वाढला होता. हाडापेराने मोठा दिसे. अद्याप त्याच्या तोंडावर थोडी कोवळीक दिसत होती. जाईही पंधरा-सोळा वर्षांची झाली. रामजी त्या दोघांकडे बघे व प्रसन्नपणे हसे. तो आता वृध्द होत चालला होता. आपली इच्छा आपल्या डोळयांदेखत पूर्ण करून घ्यावी असे त्याच्या मनात येऊ लागले.
एके दिवशी रामजीने मोहनला हाक मारली. 'काय बाबा?' त्याने मोहक वाणीने विचारले.
'मोहन, तू आज्ञाधारक मुलगा आहेस. तू मला फार आवडतोस, आता माझं वय होत आलं. फार दिवस ह्या जगात मी जगेन असं मला वाटत नाही.' असे म्हणून रामजी थांबला.
'बाबा, असं का म्हणता? तुम्ही आम्हाला पुष्कळ दिवस हवेत. आई कधीच सोडून गेली. तुम्हीही का जाणार? जाईला व तुमच्या मोहनला तुमच्याशिवाय कोण?' मोहन दु:खाने म्हणाला.
'मोहन, आज मी तुला मुद्दाम हाक मारली. माझी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. किती तरी वर्षं ती इच्छा माझ्या मनात आहे. पित्याची इच्छा पूर्ण करून देशील का त्याला समाधान?' रामजीने विचारले.
'बाबा, तुमच्यासाठी मी काय करणार नाही? सांगा तुमची इच्छा. ह्याच्या आधीच का सांगितली नाहीत ती?' मोहन म्हणाला.