जाई 3
'प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. बाळ मोहन, तुझं लग्र करावं असं माझ्या मनात येतं, तू आहेस तयार?' पित्याने प्रश्न केला.
'बाबा, आधी जाईचं करा. तुमच्या हातून आधी तिचं लग्न होऊ दे. तिला ना आई ना बाप. तुम्ही तिला आई-बापाची आठवण होऊ दिली नाहीत. तुम्ही तिचं सारं केलंत. तिचे सारे लाड पुरविलेत. आता एवढं आणखी करा.' मोहन म्हणाला.
'तुमचं दोघांचं लग्न मी एकदमच करणार आहे!' रामजी हसून म्हणाला
'कोणता पाहिलात मुलगा? गरीब असला तरी चालेल; परंतु निरोगी, धडधाकट, प्रामाणिक व श्रमांना न कंटाळणारा असा पाहिला आहे ना? जाईला कोणतं पाहिलंत स्थळ?' मोहनने विचारले. 'नवरामुलगा जवळच आहे. जवळच राहातो. चांगला आहे. देखणा आहे, गुणी आहे.' पिता म्हणाला.
'कुठंसा राहातो?' मोहनने उत्सुकतेने विचारले.
'इथचं.' पिता बोलला.
'काय त्याचं नाव?' मोहनची उत्सुकता फारच वाढली.
'मोहन!' पिता शांतपणे म्हणाला.
क्षणभर कोणीही बोलले नाही. तेथे गंभीरता पसरली. पिता-पुत्र विचारात मग्न झाले. पिता पुत्राकडे बघत होता, पुत्र खाली बघत होता.
'अशक्य, अगदी अशक्य.' असे शब्द मोहनच कापर्या ओठांतून बाहेर पडले.