Get it on Google Play
Download on the App Store

अश्रूंचे तळे 5

परंतु तो धर्मा कोठे होता? अन्नाची वाट पाहून सारे भिकारी गेले. त्या धर्मशाळेत सारे शिरले. मिळालेले तुकडे तळयाकाठी बसून ते खाऊ लागले. परंतु धर्मा कोठे आहे? तो का अजून भीक मागत हिंडत होता? का पित्याच्या अस्थी जेथे होत्या, तेथे तो पूजा करावयास गेला होता?

रात्रीचा थंडगार वारा सुटला होता. रस्त्याच्या कडेला लोटलेला तो पाहा एक जीव जिवंत होत आहे. अरे, हा तर आपला धर्मा. त्याच्याने उठवत नाही. ईश्वराचा वार्‍याच्या रूपाने आलेला थंड शीतल हात त्याच्या सर्वांगावरून फिरला. त्याच्यात जीवन आले. हे काय? तो काय शोधीत आहे? धर्मा? काये रे तुझे हरवले? लाडू-जिलबीचा तुकडा? भजे का भाजी? काय हरवले?

'गेलं, माझं सर्वस्व गेलं. अरेरे! आता मला कोणाचा आधार? मला ऊब कोण देईल? माझे अश्रू कोण पाहील? नेल. माझं ते धोतर नेलं. लुटलं मला. माझा ठेवा कोणी रे देवा नेला? वडिलांची कृपा गेली, ते छत्र गेलं...' त्या मुलाचा शोक, त्या भिकार्‍याच्या पोराचा शोक भाकरीसाठी नव्हता, लाडवासाठी नव्हता, जिलबीसाठी नव्हता, पित्याच्या त्या स्मृतिचिन्हासाठी होता. त्या जीर्ण चिंधीसाठी होता.

धर्माच्या पोटात कळा येत होत्या. त्या भुकेच्या होत्या का लत्ताप्रहाराच्या होत्या, का उभय होत्या? पोटावर हात ठेवून कसा तरी धर्मा चालत जात होता. त्याचे होते नव्हते ते सारे बळ जणू निघून गेले. त्या वस्त्रात चैतन्य होते. त्याचे प्राण वस्त्रमय होते. वाटेत घेरी येई, डोळयांसमोर अंधारी येई व तो बसे. कसे तरी करून तो त्या धर्मशाळेत जाऊ इच्छीत होता.

शेवटी तो पोहोचला. त्या तळयाच्या काठी तो गेला. तेथे तो रडत बसला. डोळ्यांतील अश्रुसागर तलावात रिता होऊ लागला. तो तलाव जणू भिकार्‍यांच्या आसवांचाच झालेला होता. रडता रडता धर्मा झोपला. त्याला चिरझोप लागली.

गोपाळदासांच्या घरी संगीत चालले होते. 'वाहवा, क्या मजा है!' असे रसिक म्हणत होते, सिगरेट ओढीत होते. विडे खात होते. पेले झोकीत होते.

सकाळची वेळ झाली सुर्यनारायण बाहेर आला. पाखरे घरटयांतून बाहेर पडली. भिकारी वणवण करण्यासाठी बाहेर पडले. परंतु त्या तळयाकाठी कोण अजून निजलेले आहे? धर्मा आहे तो. त्याचे प्राणही देवाघरी भिक्षा मागण्यासाठी गेले आहेत. तेथे तरी त्याला भीक मिळेल का?

घामाची फुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वर्गातील माळ 1 स्वर्गातील माळ 2 स्वर्गातील माळ 3 स्वर्गातील माळ 4 स्वर्गातील माळ 5 स्वर्गातील माळ 6 स्वर्गातील माळ 7 स्वर्गातील माळ 8 स्वर्गातील माळ 9 जाई 1 जाई 2 जाई 3 जाई 4 जाई 5 जाई 6 जाई 7 जाई 8 जाई 9 जाई 10 जाई 11 बासरीवाला 1 बासरीवाला 2 बासरीवाला 3 बासरीवाला 4 बासरीवाला 5 बासरीवाला 6 बासरीवाला 7 अश्रूंचे तळे 1 अश्रूंचे तळे 2 अश्रूंचे तळे 3 अश्रूंचे तळे 4 अश्रूंचे तळे 5 ज्याचा भाव त्याचा देव 1 ज्याचा भाव त्याचा देव 2 ज्याचा भाव त्याचा देव 3 ज्याचा भाव त्याचा देव 4 ज्याचा भाव त्याचा देव 5 ज्याचा भाव त्याचा देव 6 ज्याचा भाव त्याचा देव 7 थोर त्याग 1 थोर त्याग 2 थोर त्याग 3 थोर त्याग 4 थोर त्याग 5 मातृभक्ती 1 मातृभक्ती 2 मातृभक्ती 3 मातृभक्ती 4 मातृभक्ती 5 मातृभक्ती 6 मातृभक्ती 7 बहुला गाय 1 बहुला गाय 2 बहुला गाय 3 बहुला गाय 4 बहुला गाय 5 बहुला गाय 6 घामाची फुले 1 घामाची फुले 2 घामाची फुले 3 घामाची फुले 4