बहुला गाय 6
डुबा: मला मरणाची भीती थोडीच आहे!
बहुला: बाळ, आता पुरे. कृष्णदेवाचं स्मरण कर. आता बोलू नको. मरणाच्या वेळेस गर्व नको. फुशारकी नको.
मायलेकरे तयार झाली. मरणाची वाट पाहू लागली. वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात, त्याचे तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडतात, हयाची वाट पाहू लागली; परंतु छे:, हया गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. कृष्णदेवाचे ध्यान करण्यात ती दोघे रंगली होती. वाघबीघ विसरून गेली होती.
आकाशातून पुष्पवृष्टी झाली. बहुला व डुबा हयांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याऐवजी फुले पडली. मायलेकरे चपापली. ती वर पाहू लागली, तो फुलांचा वर्षाव होत होता. वाघाला ती पाहू लागली. वाघ कोठेच दिसेना. बहुला व डुबा उभी राहिली, तो त्यांना समोर कोण दिसले?
पालनवाला। श्रीकृष्ण तिथे अवतरला॥
मोरमुकुट तो माथ्यावरती
मंजुळ मुरली धरली ओठी गळयात डोले सु-वैजयंती
प्रभुवर आला ॥ श्रीकृष्ण तिथे अवतरला॥
रक्षण भक्तांचे करणारा
भक्षण असुरांचे करणारा
श्यामसावळा गिरी धरणारा
धावत आला॥ श्रीकृष्ण तिथे अवतरला॥
उभा राहिला देव येउनी
हृदयी गेल उंचबळूनी
बहुलेच्या सत्तवास पाहुनी
अतिशय धाला॥ श्रीकृष्ण तिथे अवतरला॥
कृष्ण परमात्म्यास समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. डुब्यानेही तसेच केले. कृष्णदेवाने आपल्या अमृतस्पर्शी हस्ताने डुब्याला थोपटले. देव म्हणाला, 'बहुले, बाई कष्टी होऊ नकोस. तू माझ्या परीक्षेत उतरलीस. आता मी कायमचा तुझा सेवक आहे आणि डुब्या तूही आईला शोभेसा आहेस. आईची परंपरा पुढं चालवशील. बहुले, तुला जे मागावयाचं असेल ते माग. मी प्रसन्न झालो आहे.' बहुला म्हणाली, 'देवा, हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळ दूर जाण्याचा मोह मला कधी न होवो. नेहमी तुझ्याजवळ राहाण्याचीच इच्छा आम्हा मायलेकरांस होवो. दुसरं काय मागू?'