स्वर्गातील माळ 7
रुपी म्हणाली, 'आणि त्याला फराळाचं तरी किती वाढलं आहेस? त्या देण्याघेण्याच्या कमी पुरणाच्या करंज्या का वाढल्या नाहीस त्याला?'
सखू म्हणाली, 'मी माझा वाटा त्याला दिला. आज मी तुमच्याकडे जेवणार नाही, खाणार नाही. म्हणजे झालं ना?'
रुपी रागाने म्हणाली, 'आम्हाला लाजवतेस वाटतं? वाहवा ग वाहवा! म्हणे माझा वाटा दिला!'
सखू त्या मुलाला म्हणाली, 'बाळ, पोटभर जेव. मग मी माझ्या आईच्या घरी तुला पोचवीन. तिथं तू झोप हो.'
माणकी त्या मुलाकडे पाहात म्हणाली, 'काय रे पोरा, तू कोठल्या गावचा?'
तो मुलगा म्हणाला, 'माझ्या गावाचं नाव आनंदपूर.'
हिरी म्हणाली, 'मग आनंदपूर सोडून इकडे दु:खात कशाला आलास?'
तो मुलगा म्हणाला, 'माझ्या गावासारखा दुसरा गाव जगात आहे की नाही ते पाहाण्यासाठी आलो!'
रुपीने विचारले, 'तुझ्या गावात काय आहे?'
तो मुलगा म्हणाला, 'माझ्या गावात भांडण नाही, तंटा नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. कोणी कोणाला तुच्छ मानीत नाही, हीन समजत नाही. सारे उद्योग करतात. एकमेकांस मदत करतात. माझ्या गावात लोकांची मनं प्रेमानं भरलेली असतात. नद्या, विहिरी पाण्यानं भरलेल्या असतात. झाडंमाडं फुलाफळांनी भरलेली असतात. शेतंभातं धान्यानं भरलेली असतात. माझ्या गावात रोग नाही, दुष्काळ नाही, दारिद्र्य नाही, दास्य नाही.'
माणकीने विचारले, 'तसा दुसरा गाव तुला आढळला का?'