परशुराम अवतार
हिंदू धर्म ग्रंथांनुसार परशुराम भगवान विष्णूंच्या प्रमुख अवतारांपैकी एक होते. भगवान परशुरामांच्या जन्मासंबंधी दोन कथा प्रचलित आहेत. हरिवंश पुराणानुसार त्यापैकी एक कथा अशी आहे .
प्राचीन काळी महिष्मती नगरीवर हैयय वंशातील शक्तिशाली क्षत्रिय राजा कार्तवीर्य अर्जुन (सहस्त्रबाहू) याचे राज्य होते. तो अत्यंत गर्विष्ठ होता आणि अत्याचारी देखील. एकदा अग्निदेवाने त्याला जेवण देण्यास सांगितले. तेव्हा सहस्त्राबाहुने घमेंडीत सांगितले की तुम्हाला हवे तिथे जेवण मिळेल, सारीकडे माझेच राज्य आहे. तेव्हा अग्निदेवाने जंगले जाळायला सुरुवात केली. एका वनात ऋषी आपव तप करत होते. अग्नीने त्यांचा आश्रम देखील जाळून टाकला. त्यामुळे क्रोधीत होऊन ऋषींनी सहस्त्राबाहुला शाप दिला की भगवान विष्णू परशुरामाच्या रुपात जन्म घेतील आणि केवळ तुझाच नाही तर संपूर्ण क्षत्रिय वंशाचाच सर्वनाश करतील. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भार्गव कुळात महर्षी जमदग्नींच्या चौथ्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.