Android app on Google Play

 

मोहिनी अवतार

 


धर्म ग्रंथांनुसार समुद्र मंथनातून सर्वात शेवटी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. अमृत मिळताक्षणी शिस्तीचा भंग झाला. देव म्हणाले आम्ही घेणार, दैत्य म्हणाले आम्ही घेणार. याच ओढाताणीत इंद्राचा पुत्र जयंत अमृत कुंभ घेऊन पळून गेला. सारे दैत्य आणि देवता देखील त्याच्या मागे धावले. असुर आणि देवता यांच्यात भयंकर बाचाबाची, मारामारी झाली.
देवता अस्वस्थ होऊन भगवान विष्णूंकडे गेले. तेव्हा भगवान विष्णूनी मोहिनी अवतार घेतला. भगवंतांनी मोहिनी रुपात सगळ्यांना मोहित करून टाकले. मोहिनीने देव आणि दैत्यांचे ऐकून घेतले आणि म्हणाली, की हा कलश मला द्या, मी आळीपाळीने देव आणि दैत्यांना ते पाजेन. दोनही पक्ष मान्य झाले. देवता एका बाजूला आणि असुर दुसऱ्या बाजूला बसले.
तेव्हा मोहिनी रुप घेतलेल्या भगवान विष्णूनी मधुर गीत गात, आणि नृत्य करत देवता आणि असुरांना अमृत पाजण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात मोहिनी केवळ देवतांनाच अमृत पाजत होती, परंतु असुरांना असे वाटत होते की ते देखील अमृत पीत आहेत. अशा प्रकारे भगवान विष्णूनी मोहिनी अवतार घेऊन देवतांचे भले केले.