मुलगा आणि नाकतोडा
एक मुलगा एका शेतात टोळ धरत असता, गवतावर बसलेला नाकतोडा या नावाचा टोळ त्याच्या हाती सापडला. इतर टोळांप्रमाणे हा टोळही दुष्टच असेल अशा समजुतीने तो मुलगा त्याचा जीव घेऊ लागला. तेव्हा नाकतोडा दीनवाणे तोंड करून त्याला म्हणाला, 'अरे, मी आजपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख दिलं नाही की कोणाचं नुकसान करण्याची शक्तीही माझ्या अंगी नाही. गवतावर बसून गायन करावं, इतकंच काय ते मला ठाऊक. असं असताना माझा गरीबाचा जीव घेऊन तुला काय मिळेल बरं ?' हे ऐकून मुलाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले.
तात्पर्य
- निरपराधी प्राण्याचा आपल्या हातून छळ होऊ नये याबद्दल काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.