सिंह, अस्वल आणि कोल्हा
एका अरण्यात एक सिंह व अस्वल दोन दिशांकडून धावत असता, दोघांनाही एकदम एका हरणाचे प्रेत दिसले. ते प्रेत कोणी घ्यायचे याबद्दल त्यांचा वाद होता होता दोघांमध्ये लढाई जुंपली. बराच वेळ लढून दोघेही घायाळ होऊन थकून जमिनीवर पडले. इतक्यात एक कोल्हा त्या वाटेने जात होता, त्याने त्या दोघांची ती अवस्था पाहून निर्भयपणे ते प्रेत तेथून उचलले व घेऊन गेला. ते दोघेही कोल्ह्यापेक्षा बलवान होते. परंतु भांडण करून शक्तीहीन झाल्यामुळे, ते त्याला अडवू शकले नाहीत. मग सिंह अस्वलाला म्हणाला, 'अरे, हा पहा आपल्या भांडणाचा परिणाम ! तो लबाड कोल्हा आमच्या डोळ्यादेखत ती शिकार घेऊन चालला आहे, पण आम्ही आपपासात भांडून इतके दुर्बल होऊन बसलो आहोत की, त्याला अडविण्याची ताकदही आपल्या अंगी राहिली नाही.'
तात्पर्य
- एखाद्या वस्तूच्या मालकीसंबंधी तंटा उपस्थित झाला असता शक्यतो तो तडजोडीने मिटविण्याची व्यवस्था व्हावी हा उत्तम मार्ग; नाही तर 'नाही तुला, नाही मला, घाल कुत्र्याला !' अशी स्थिती होते.