सिंह, गाढव आणि कोल्हा
एकदा एक सिंह, एक गाढव व कोल्हा या तिघांमध्ये आपापसात करार झाला की, तिघांनी मिळून रानात जाऊन शिकार करावी व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यावे. याप्रमाणे ठराव करून ते शिकारीस गेले व तेथे मोठा धष्टपुष्ट सांबर त्यांनी मारला. त्या सांबराचे तीन भाग करण्यास सिंहाने गाढवाला सांगितले. त्याप्रमाणे गाढवाने सांबराचे तीन सारखे भाग केले. ते पाहून सिंहाला इतका राग आला की, त्याने एका क्षणात आपल्या पंजाने गाढवाचे आतडे बाहेर काढले. नंतर कोल्ह्याला तो म्हणाला, 'अरे, आता या शिकारीचे तू भाग कर.' कोल्हा मुळातच धोरणी. त्याने त्या सांबराच्या मांसाचा एक लहानसा तुकडा तोडून घेतला व उरलेले सगळे मांस सिंहाच्या स्वाधीन करून त्याला म्हटले, 'सरकार मला एवढंच पुरे, बाकी उरलेला सर्व भाग आपणच घ्या.' हे त्याचे चातुर्य पाहून सिंहाला समाधान वाटले. मग तो त्याला विचारू लागला, 'अरे, हा संभावितपणा तुला कोणी शिकवला?' कोल्हा लगेच म्हणाला, 'सरकार, खरं सांगाल तर आपल्यापुढे मरून पडलेल्या गाढवानंच मला हे शिकवलं !'
तात्पर्य
- कोणती गोष्ट केल्यामुळे कोणावर काय संकट आले, हे लक्षात ठेवून जो वर्तन करतो, तो सहसा संकटात पडत नाही.