उंदीर आणि बोका
एक उंदीर आपल्या बिळात फार आजारी पडला असता, एक बोका त्याच्या समाचारास आला. बिळाच्या तोंडाशी बसून तो मोठ्या कळवळ्याने उंदरास म्हणाले, 'बाबा रे, आता तुझी प्रकृती कशी काय आहे ! आता तरी तुला थोडं बरं वाटतं का ? तुला औषधपाणी जे काय लागेल, ते मला सांग मी सगळं आणून देईन. काही संकोच करू नकोस. शेजारी जर शेजार्याच्या उपयोगी पडणार नाही, तर दुसरं कोण पडेल ? पण तू थोडा वेळ बाहेर ये पाहू. तुला पाहिल्याशिवाय तुझी प्रकृती कशी काय आहे, हे वैद्याला खुलासेवाररीतीने मला सांगता येणार नाही.' उंदराने आतूनच उत्तर दिले, 'मित्रा, आपल्या शेजारधर्मास जागून माझ्याविषयी तू जी आपुलकी दाखवलीस, त्याबद्दल मी तुझा फार आभारी आहे. आता माझं एक काम कर, तू एकदाचा येथून लवकर निघून जा. आणि पुनः इकडे मुळीच येऊ नकोस. म्हणजे मला लवकर बरं वाटेल !'
तात्पर्य - जेव्हा आपले शत्रू आपल्याविषयी एकाएकी फार आस्था दाखवू लागतात तेव्हा त्यात काही तरी स्वार्थ साधण्याचा त्यांचा हेतू आहे हे समजून असावे.