वानर व अग्नी
देवाने अग्नी जेव्हा प्रथम निर्माण केला तेव्हा त्याचे तेज व सौंदर्य पाहून एक वानर इतके भुलून गेले की, गुडघे टेकून त्याला मिठी मारायला तयार झाले. त्या वेळी तेथे असलेला देवदूत त्याला म्हणाला, 'अरे तुला आपल्या दाढीची काळजी आहे ना ? असेल तर अग्नीपासून दूर रहा. जवळ जाशील तर हा अग्नी तुला जाळून टाकील. ते ऐकून वानर म्हणाले, 'असं आहे, तर हा मोहक पण भयंकर पदार्थ देवाने का बरं निर्माण केला ?' यावर देवदूत म्हणाला, 'अरे वानरा, याच्याशिवाय माणूस जिवंत राहू शकणार नाही, या वस्तूचा दुरुपयोग केला तर माणूस संकटात पडेल, पण हिचा प्रकाश नि उष्णता यांचा चांगला उपयोग केल्यास हीच वस्तू माणसास सुखकारक होईल.
तात्पर्य
- पाणी, वीज किंवा अग्नी या वस्तू अशा आहेत की, त्यांचा जसा सदूपयोग केला असता त्या वस्तू माणसाच्या हिताला कारण होतील पण दुरुपयोग केला असता त्याच वस्तू माणसाचा नाशही करू शकतील.