माणूस आणि मुंगूस
एका माणसाने एक मुंगूस पकडले आणि तो त्याचा जीव घेऊ लागला. तेव्हा ते मुंगूस दीनपणे त्याला म्हणाले, 'बाबा रे, मला मारू नकोस, मी आजपर्यंत सारखा तुझ्या उपयोगीच पडत आलो आहे. मी तुझ्या घरात असल्यामुळे उंदीर आणि साप यांचा उपद्रव तुला होत नाही.' त्यावर माणूस म्हणाला, 'उंदीर आणि साप यांचा तू नाश करतोस, हे खरं, पण ते तू माझ्यासाठी करीत नाहीस. स्वतःच्या सुखासाठी करतोस. शिवाय तुझ्यामुळे उंदराचा उपद्रव जरी कमी झाला आहे; तरी तुझ्याकडून मला उपद्रव होतो आहेच. अशा वेळी तुझ्या उपकाराच्या गोष्टी मी काय म्हणून ऐकून घेईन ?' इतके बोलून त्याने त्याला मारून टाकले.
तात्पर्य
- आपण जे कृत्य स्वार्थासाठी केले त्यामुळे जरी दुसर्याचा थोडासा फायदा झाला, तरी तो आपण त्यावर उपकार केला असे होत नाही.