साळू आणि लांडगा
साळूच्या अंगावरचे बारीक काटे जर नाहीसे होतील तर तिच्या मांसावर ताव मारू , असे एका लांडग्याला वाटले. मग तो साळूजवळ जाऊन म्हणाला, 'शांततेच्या वेळी असं लढाई चालू असल्याप्रमाणे शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन राहणं बरोबर नाही. म्हणून मी तुला सांगतो की, तू हे आपल्या अंगावरचे काटे काढून टाक, तशी वेळ आलीच तर तुला ते पुन्हा धारण करता येतील.' त्यावर साळू म्हणाली, 'अरे, हल्ली सर्वत्र शांतता आहे, असं जरी तुला वाटलं तरी मला तसं वाटत नाही. जोपर्यंत तुझ्यासारखे लांडगे, माझ्या आसपास फिरताहेत, तोपर्यंत लढाई चालूच आहे असं समजून मी अशीच सज्ज होऊन राहणार.'
तात्पर्य
- शत्रूच्या भुलथापा ऐकून आपल्या हातातील शस्त्रे टाकून देणे, म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे होय.