चिटुकल्या गोष्टी 7
भीमाची गोष्ट :
एकदा पांडवांकडे कसला तरी सण होता. धर्माला वाटले की कृष्णालाही आज जेवायला बोलवावे. आधी कळवतां आले नव्हते. परंतु कृष्ण आढेवेढे घेईल असे कोणालाच वाटले नाही.
धर्मराज अर्जुनाला म्हणाले, ''तू जा. देवाचे तुझ्यावर सर्वांत अधिक प्रेम-घेऊन ये त्याला जेवावयाला.''
अर्जुन निघाला. आज कृष्ण सर्वांची परीक्षा करणार होता. देव पलंगावर झोपून राहिले. अर्जुन हाका मारीत आला. कृष्ण भगवान झोपलेले. देवाला जागे करून अर्जुन म्हणाला, ''जेवायला चल आधी. सारे खोळंबले आहेत.''
कृष्ण म्हणाला, ''अर्जुना, आज बरे नाही वाटत. पडूनच राहतो.''
अर्जुन म्हणाला, ''तुला अगदी मान चढला वाटते आज?'' मी आग्रह नाही करीत बसणार. देवा येतोस की नाही?
''अरे मला का आग्रह लागतो? तू जा.'' देव म्हणाले.
अर्जुनाच्या बोलावण्यानेहि देव आला नाही. आता काय करायचे?
नकुळ म्हणाला, ''मी जाऊन येतो.''
कृष्णाने त्यालाही गोड बोलून दिले लावून. सहदेवाची तीच गत झाली. आता राहिला गदाधारी भीम.
''मी जाऊं का दादा?'' त्याने धर्माला विचारले.
त्याबरोबर सारे खो खो करून हसू लागले. ''तू का त्याला गदेची धमकी देणार की ऐरावत स्वर्गांतून आणलास त्याप्रमाणे त्याची गठडी बांधून आणणार?'' अर्जुनाने विचारले.
धर्मराज शांतपणे म्हणाले, ''हंसू नका रे. तुम्ही सारे जाऊन आलात. त्यालाही जाऊन येऊ दे. भीमा, जा तू. यांच्या हसण्याकडून नकोस लक्ष देऊ.''
भीम निघाला. कृष्णाने तर्क केलाच होता की आता भीमदादा येतील म्हणून. त्याने कपाळावर सुंठ घातली होती. चांगलेच नाटक केले.