अखेरची मूर्ति 4
त्याने बनविलेली सारी खेळणी कृष्णाला दिली. म्हणाला, ''घेऊन जा. पुन्हा या. बनविलेली सारी खेळणी देत जाईन, पण एकच करा माझ्यासाठी. बाबाजींना तेवढी दाखवा, त्यांना पसंत पडली की सारे मला पोचले. त्यांचे धन्योद्गार मला प्यारे आहेत.''
कृष्णाच्या मनातला ईष्याग्नि तेथेही त्याला स्वस्थ बसू देईना. धनलोभापेक्षाही तो प्रबल झाला. ''बाबाजींच्याकडून शाबासकी पाहिजे काय तुला? मला हिणवू पाहतोस? घे, बाबाजींची शाबासकी.'' असे पुटपुटत गावातल्या कुंभारवाडयाजवळच्या एका दगडावर त्याने सारी खेळणी आपटून फोडून टाकली.
बाबाजींना मुरुगनची चिंता वाटे. अगदी राहवले नाही म्हणजे म्हणत, ''कृष्णा, मुरुगनचे ठीक आहे ना रे? विचार तरी कोणाला.''
पण कृष्ण म्हणे, ''तो चांभारडा मरो की तडफडो. पाजी माणसाने सारी कमाई खाल्ली. प्रायश्चित्ताला हजार रुपये लागले.''
बाबाजींना वाटे कुठून आपण हा विषय काढला. परंतु त्यांचे मन सारखे मुरुगनकडे ओढ घेई. त्यांनी मुरुगनचा जणू ध्यास घेतला. मुरुगनची ती मूर्ती, ती कलामग्नता, सारे त्यांच्या डोळयांपुढे येई. ''किती सेवा भाव! चांभार असला म्हणून काय झाले. पण किती कलाप्रेम! माझा खरा वारस तर मुरुगनच आहे.'' पण हे सारे तोंडातून उच्चारायची सोय नव्हती. त्यांना जीवन नीरस वाटे. दिवसेंदिवस प्रकृति खालावत गेली. मुरुगनचा जप करीत त्यांनी प्राण सोडला. मुरुगनला बाबाजींच्या मृत्यूची वार्ता समजली. फार वाईट वाटले त्याला. त्यांचे शेवटचे दर्शन घेऊन यावे असे त्याच्या मनात येई. परंतु कृष्णाचा स्वभाव त्याला ठाऊक होता. शेवटी रात्री गुपचूप तो स्मशानात गेला. खूप रडला. चितेला अश्रूंची अंजली त्याने वाहिली. ते भस्म डोक्याला लावले, डोळयांना लावले, बाबाजींना जणू तो आपल्यात सामावून घेऊ पाहत होता. बाबाजींच्या स्मरणाने त्याचे डोळे भरून येत. त्याने विचार केला बाबाजींचीच एक मूर्ती केली तर! आपल्या घरात तेच त्यांचे स्मारक.
आता तो सारे विसरला. बाबाजींची मूर्ती करण्यात तन्मय झाला आणि एक दिवस मूर्ती तयार झाली. सुंदर रंग त्याने आणले. रंगीत मूर्ती. जणू प्रत्यक्ष बाबाजीच समोर उभे आहेत. पण हाय! किसनदादाने ही मूर्तीही हिसकावून घेतली तर? नाही. ही लपवून ठेवू. नाही द्यायची ही मूर्ती त्याला.
आणि एक दिवस कृष्ण आला.
''काढ मूर्ति सा-या.''
''ह्या दोनच आहेत. घेऊन जा तेवढया.''
''इतक्याच?''