आशा आणि समीर 3
''अरे, मी बादशहा आहे जगाचा. इकडे ये. माझी आज्ञा आहे,'' एक वेडा म्हणाला.
''सारी संपत्ती माझी. कोण नेणार बघतो माझी संपत्ति. मी का वेडा आहे माझी संपत्ति वाटायला?'' दुसरा म्हणाला.
एकाने समीरला हाक मारली. तो वेडा जरा शांत दिसत होता.
''काय आहे म्हणणे?'' समीरने विचारले.
''तुला एक गोष्ट माहीत आहे का?'' वेडयाने विचारले.
''कोणती?''
''काल रात्री बारा वाजता बुध्दि मेली. तिची प्रेतयात्रा प्रचंड होती. तू नाही गेलास?''
''बुध्दि मेली?''
''हो. खरोखर मेली. आम्ही खोटे बोलायला का वेडपट आहोत?''
समीरला त्या वेडयांच्या संगतीत गुदमरल्यासारखे वाटते. तो पुन्हा समुद्रतीरावर येतो. गलबत तेथे असते.
''मला न्याल का?'' तो विचारतो.
''कोठे?''
''माझ्या गावाला.''
''चल, परंतु तुझे दिवस थोडे आहेत.''
''लौकर न्या.''
तो गलबतात बसतो. तेथे एक विचित्र मनुष्य असतो. तो निरनिराळे ठसे पाडीत असतो. बटणें करीत असतो. जी नीट बसत नाहीत ती पुन्हा मोडतो.
''आपण कोण?'' समीर विचारतो.
''मी बटण-मेकर. जी बटणे नीट काम देत नाहीत, त्यांना मी वितळवतों, भट्टींत घालतों. पुन्हा बनवतों,'' तो म्हणाला. समीर विचार करीत होता. ईश्वरहि असेच करीत असेल. त्याच्या विश्वयोजनेत जो नीट बसत नसेल त्याला तो मोडून पुन्हा बनवीत असेल. मी त्याच्या विश्वयोजनेत बसलो की नाही? ज्या कामासाठी त्याने मला निर्मिले ते मी नाही का बजावले? म्हणून का मला मोडून पुन्हा बनवणार? तो विचारात होता. गलबत तीराला लागले. तो उतरला नि निघाला. कोठे जात होता तो? त्याला आशाची आठवण आली. कोठे असेल आशा, खरेच कोठे असेल?