कुटुंबाचा आधार 3
तो धट्टाकट्टा मुलगा त्याच्या पोठोपाठ गेला. तो तिकडे वडया विकू लागला. दौलत मात्र भीतीने तेथेच उभा राहिला. त्याला आत घेणा-या त्या तरुणाने त्याला जवळ बसविले.
''मला दे एक आण्याच्या.'' तो म्हणाला.
दौलतने इकडे तिकडे पाहून दिल्या, इतरही आया बाया घेऊ लागल्या. तो चहावाला येत नाही बघून दौलत देई. सर्वांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटली.
''तुझे काय नाव?'' त्या तरुणाने विचारले.
''दौलत.''
''तू कुठला?''
''आम्ही सिंधमधून आलो. कल्याणजवळ राहतो. निर्वासितांच्या छावणीत. आई, वडिल, भावंडे आहेत. वडील मोटार कारखान्यात दुरुस्तीला जातात. परंतु ते आजारी आहेत. मी वडया विकतो. दिवसा तीन रत्तल तरी खपवतो. म्हणजे रुपया मिळतो. तिकडे, कल्याणच्या तिकडे नाही होत त्रास. लोकल गाडीत त्रास नाही. परंतु हा चहावाला मारतो. आई म्हणते कर्जतपर्यंत जावे. लांबची माणसे असतात. लहान मुले-बाळे असतात. वडया घेतात. म्हणून येतो. आज तुम्ही आधार दिलात. कोणी तरी भेटतो.'' तो बोलत होता. लोकांना त्याच्याविषयी प्रेम वाटले. जवळ जवळ सतरा अठरा लोकांनी आण्या आण्याच्या वडया घेतल्या. आणि दौलत मोजीत होता. त्याचे तोंड हसले, फुलले. आज किती लौकर खरेदी झाली. आणि कल्याण स्टेशन आले. दौलतने आठ वडया घेतल्या आणि त्याला गाडीत घेणा-या त्या तरुणाला म्हणाला,
''घ्या तुम्ही ह्या. नाही म्हणू नका. तुम्ही मला जवळ बसवलेत. आई विचारील ना त्यांना दिलीस का वडी. मग काय सांगू? घ्या. गरीबाची भेट घ्या.''
तो तरुण घेईना. परंतु त्या लहान मुलाच्या मनातील कृतज्ञतेची भावना दुखवली जाऊ नये म्हणून त्याने त्या घेतल्या. परंतु कर्जतला घेतलेला चिवडयाचा पुडा अर्धा शिल्लक होता. त्या तरुणाने तो चिवडा त्याला दिला.
''हा घे. मजजवळ तुला द्यायला दुसरे काय आहे? घरी तू, तुझी भावंडे खा. सुखी असा. तू कष्ट करतोस. देव तुला सांभाळील.''
दौलत उभा होता. मेल निघाली. तो तरुण गाडीत बसला. तो खिडकीतून बघत होता. दौलतही त्याच्याकडे पहात होता. गेली गाडी आणि दौलत धावत घरी आला,
''आई आज किती लौकर विक्री.''
असे म्हणून त्याने सारी हकीगत सांगितली. तिने त्याला पोटाशी धरले. तिचे अश्रू त्याच्या मस्तकावर पडले.