* शहाणा झालेला राजपुत्र 4
राजपुत्राला निरोप कळविण्यांत आला. तो रडत बसला. बहिण येऊन म्हणाली, ''दादा, का रडतोस?''
त्याने वृत्तांत सांगितला.
ती म्हणाली, ''गावाबाहेर जाऊन दोन कोसांवर बसून रहा. चिंता नको करूस.''
राजपुत्र पायीं निघाला व जाऊन बसला. बहिण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावर ती हरणी बनली. वा-याप्रमाणे ती पळत सुटली. अंधा-या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहिण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली, ''जा, राजाला ही नेऊन दे.''
राजपुत्राने ता-यांप्रमाणे चमकणारी ती फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला.
राजा खुशमस्क-याला म्हणाला, ''आता कोणता उपाय?''
''त्याला सांगा की बहिण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे. नाहीतर डोके उडवीन.'' खुशमस्क-याने सुचविले.
राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला, ''दादा, का रडतोस?'' राजपुत्राने वृत्तांत निवेदिला. ''रडू नको दादा. शहराबाहेर बस चिंता नको करूस.''
राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊहि बाहेर गेला. नि तो बेडूक बनला. ड्राँव ड्राँव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडूक जमा झाले. तो त्यांना म्हणाला, ''त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन्हां पुन्हां बुडयां मारू. मिळतील ती मोती तोडात धरून आणू, राजाच्या अंगणात ढीग घालू.''
सा-या बेडकांनी ऐकलें आणि त्याप्रमाणें त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणा-या मोत्यांचे ढीग पडले.
भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, ''राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीचा मोती निवडून घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झालें. घ्या म्हणावे ओळखून.''
राजपुत्र राजाला तसें सांगून आपल्या राजवाडयांत परत आला. राजाने खुशमस्क-याला विचारले, ''आता काय?''
''त्या राजपुत्राला म्हणावे बहिण दे नाहितर स्वर्गात जाऊन ये. आमच्या वडिलांची करमणूक करायला कोणी आहे की नाही ते विचारून ये'' खुशमस्क-याने सुचविले.
''तो स्वर्गात कसा जाणार?''
''तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू.''