अखेरची मूर्ति 2
नवरात्र जवळ आले होते. नवरात्रीची यात्रा सर्वत्र भरते. किसानाजवळ पैसेही चार असतात. ह्या यात्रा म्हणजे नारायण पिल्लेच्या कुटुंबाला पर्वणी. वर्षाची निम्मी कमाई नवरात्र यात्रांतून व्हायची. मुरुगन एखाद्या राक्षसांसारखे काम करी. त्याची खेळणी दूर दूर जात. तिकडे मद्रासपर्यंत त्याचा खप असे. कृष्ण आणि मुरुगन पार्सल करून रोज हजारो खेळणी सर्वत्र पाठवित. एक दिवस दोघे असेच परत येत होते स्टेशनवरून. कृष्णा विचार करीत होता. मुरुगन म्हणजे देवमनुष्य आहे. त्याचासारखा कारागीर कोठे मिळणार? मुरुगनच्या सुखाची, आरामाची आपण कधी चिंता केली नाही याचे त्याला वाईट वाटले. मुरुगनचे लग्नाचे वय होते. पण त्याला कधी कोणी याबद्दल विचारले नव्हते. आज त्याने तोच विषय काढायचा ठरविले.
परंतु स्टेशनच्या पाय-या ते उतरत होते तोच ''मुरुगा, मुरुगा'' करीत एक म्हातारा चांभार पुढे आला. त्याने मुरुगनला मिठी मारली. म्हणाला, ''मुरुगा. कितीरे तुला पहायचे? मला म्हाता-याला सोडून गेलास? इतके दिवस रहावले तरी कसे तुला? तुला किती शोधले मी. घर तुझ्याशिवाय जसे खायला येई, शोध करून करून थकलो. गेल्या वर्षी इथं आलो. बरे झाले भेटलास. चल माझ्याबरोबर.'' कृष्णाच्या लक्षातच येईना की प्रकरण आहे तरी काय? काय त्या चांभाराचा नि मुरुगनचा संबंध? कृष्णा या म्हाता-यावर खेकसला, ''काय रे थेरडया वेडबिड तर नाहीना लागले तुला? ह्या मुरुगनच्या का मागे लागला आहेस?''
''नको हो दादा असे करू. माझ्या ह्या मुलाला, मुरुगनला नका माझ्यापासून नेऊ. त्याच्याविना किती दु:खात काढली मी ही दहा वर्षे!''
त्या म्हाता-याला काय ठाऊक की त्याच्या ह्या प्रेमाने त्याच्या आवडत्या मुलावरच मोठी आपत्ती येणार आहे. क्षणभर कृष्ण दिड:मूढ आला. मुरुगनविषयी जी कृतज्ञतेची भावना त्याच्या मनात उचल खाऊ पहात होती; ती कोणल्या कुठे विलुप्त झाली. त्याच्या मनात मुरुगनविषयीचा जो द्वेषाग्नि होता त्याला ही संधी सापडली. मुरुगननेही बापाची ओळख लपविली नाही. त्याने फक्त मौन स्वीकारले.
कृष्णाच्या हाती छत्री होती. त्या छत्रीचा तो मुरुगनवर प्रयोग करू लागला, ''पापी, चांडाळा, चांभारडया आम्हांला फसवलेस. सारे घर बाटविलेस.''
कृष्णाच्या मधली स्वजातिप्रतिष्ठा, मुरुगनबद्दल वाटणारी ईष्या, त्याच्यामुळे बाबाजींनी त्याचा केलेला अपमान सा-यांचा जणू तो सूड उगवित होता. छत्री मोडेपर्यंत त्याने मुरगनला मारले. मुरुगनची शरीरप्रकृतीही ठीक होती. मनात आणता तर कृष्णालाही त्याने थोडा प्रसाद दिला असता. परंतु त्याने सारे सहन केले.