चिटुकल्या गोष्टी 6
एक सैनिक भीत भीत आला. ''हे शहर रामाचे आहे.''
भीत भीत हळूच म्हणाला.
''दाखव, मला राम दाखव.'' मारुती म्हणाला.
तो सैनिक घाबरला. पळणार तो मारुतीने शेपटात त्याला पकडले. ''चल, मी तुझ्याबरोबर येतो, दाखव राम'' मारुती म्हणाला.
मुठीत प्राण घेऊन तो सैनिक जात होता. इकडे कृष्णाने रामाचे रूप धारण केले. बळराम लक्ष्मण झाला. वनांतील रूपे त्यांनी धारण केली होती. आता सीता कोण होणार? नारदाला कृष्ण म्हणाला, ''सत्यभामेला जाऊन सांग की सीता होऊन ये.''
नारद कळलाव्या. त्याने सत्यभामेला सांगितले. ती त्याला म्हणाली, ''नारदा, सीता कशी होती?''
''उंची वस्त्रे नेस, खूप दागिने घाल.''
सत्यभामा नटली, काजळकुंकू ल्याली. राम आणि लक्ष्मण बसले होते. तेथे आली.
तो कृष्ण हसला, ''वनात का अशी सीता होती? जा तू. नारदा, रुक्मिणीला सांग जा.''
रुक्मिणीला निरोप कळताच ती एकदम सहज साधी सीता झाली. रामाजवळ येऊन बसली. तेथे गर्दी जमली. तो मारुती आला. समोर राम दिसला. मारुती धावला, चरणांवर डोके ठेवता झाला!
रामाने त्याला हृदयाशी धरले व सांगितले, ''मारुती, पूर्वीचा राम मी कृष्ण झालो, लक्ष्मण बळराम झाला. पूर्वी मी मोठा भाऊ होतो, आता लक्ष्मण मोठा भाऊ. पूर्वी त्याने माझी सेवा केली, आता त्याची मी करतो. तो राजा.''
मारुतीने पुन: पुन्हा प्रणाम केला व जाताना म्हणाला, ''देवा, तू अनंत रूपधारी परंतु तुझे वनवासातले रूपच मला आवडते!''
मारुती रामनामाचा जप करीत गेला. राम, लक्ष्मण, सीता पुन्हा कृष्ण, बळराम, रुक्मिणी झाली. गंमत झाली.