देवाचे हेतु 2
त्या मालकाने त्या दोघांकडे नीट न्याहाळून पाहिले आणि शेवटी त्याने त्यांना आत घेतले.
''पडा येथे'' तो म्हणाला.
''काही कोरडे आंथरायला द्या'' तरुण म्हणाला.
त्या भुतासारख्या मालकाने त्यांना फाटकी घोंगडी, फाटकी वाकळ आणून दिली. फाटके कपडे अंगावर घालायला दिले. ते दोघे गुरंगटी करून झोपले. आता पहाट झाली. कोंबडे आरवू लागले, पक्षी किलबिल करू लागले. साधु जागा झाला व तो तरुणहि.
''चला, आपण जाऊ'' साधु म्हणाला.
''चला'' तरुण म्हणाला.
परंतु निघण्यापूर्वी तरुणाने आपल्या पिशवीतले एक सुंदरसे चांदीचे भांडे काढले नि तेथे त्या फाटक्या कपडयांजवळ ठेवून दिले. आपले ओलसर कपडे पेहरून ते दोघे हळूच बाहेर पडले. सृष्टी धुतल्यासारखी दिसत होती. आकाश निरभ्र होते. सूर्य उगवला. त्याचे सोनेरी किरण हिरव्यागार स्वच्छ ताडामाडांवर पडून रम्य शोभा दिसत होती. ते दोघे जात होते. पुन्हा सायंकाळ झाली. त्यांना एक गाव दिसला. ते त्या गावात शिरले.
''येथे अतिथअभ्यागताला कोणी आश्रय देतो का?'' साधूने लोकांना विचारले.
''तो पलीकडे मोठा वाडा आहे तेथे जा. तेथे सर्वांचे स्वागत होते. कोणाला नकार मिळत नाही.'' लोक म्हणाले.
ते दोघे वाटसरू त्या वाडयाकडे गेले.
''या महाराज बसा'' मालक म्हणाला.
तेथे सुंदर बैठक होती. पानसुपारीचे तबक होते. त्या गृहस्थाने त्या पाहुण्यांना सुंदर मेजवानी दिली. चांदीची ताटे होती, चंदनी पाट होते. आपले सारे वैभव मालक दाखवीत होता. भोजनोत्तर त्यांना स्वच्छ आंथरूणे देण्यात आली. दमलेले वाटसरू सुखाने झोपले. नेहमीप्रमाणे साधूला पहाट होताच जाग आली. तरुणहि जागा होता.
''चला जाऊ'' तो म्हणाला.
''त्यांचे आभार मानून जाऊ'' साधु म्हणाला.