देवाचे हेतु 4
आता तर साधूला त्या तरुणाची फारच भीती वाटू लागली. मुकाटयाने सायंकाळपर्यंत दोघे जात होते. पुन्हा एक गाव आला. एका भल्या माणसाकडे उतरले. रात्रभर पाऊस पडत होता. परंतु पहाटेच्या वेळेस थांबला. हे दोघे उठून निघाले. सकाळी उठून यजमान बघतो तो दोघे पाहुणे गेलेले. तो आपल्या गडयाला म्हणाला, ''अरे ते रस्ता चुकतील. नदीला पूर आला आहे. त्यांना साकव आहे तिकडचा रस्ता दाखव.''
गडी पळत आला व म्हणाला, ''साकवाच्या बाजूने चला. इकडून उतार नाही. साकवावरून पलीकडे जायला हवे. मी दाखवितो रस्ता.''
तिघे जात होते. फेसाह नदी दुथडी उसळत जात होती.
''हा बघा साकव'' गडी म्हणाला.
गडी पुढे, तरुण मागे, त्याच्या मागे तो साधु. असे साकवावरून जात होते. तो तरुणाने त्या गडयाला एकदम नदीत लोटले. गडी गटंगळया खाऊ लागला. तुफान नदीने त्याला नेले.
''हे काय केलेस दुष्टा!'' साधु ओरडला.
''तुम्हाला कळत नाही'' तरुण म्हणाला.
नदीपलीकडे दोघे आले. याला काही तरी करून चुकवावे असे साधुला वाटत होते. परंतु तो तर छायेप्रमाणे पाठोपाठ येत होता. साधु भरभर जाऊन झाडाआड लपे तर तो तरुण तेथे येई व म्हणे, ''चला.''
परंतु एकाएकी तरुण अदृश्य झाला. साधु इकडे तिकडे पहात होता. तो तरुण कोठेच दिसेना. इतक्यात एकाएकी तेथे एक दिव्य आकृति त्याला दिसली.
''कोण तुम्ही?'' साधूने विचारले.
''मी देवदूत. मीच तुझ्याबरोबर होतो.''
''तुम्ही?''
''हो. तुझ्या मनात आलेला संशय दूर करण्यासाठी देवाने मला पाठविले.''
''संशय तर वाढतच आहेत. तुमच्या वर्तनाचाच आधी उलगडा करा. आपण त्या प्रचंड वाडयात रात्री राहिलो. तुम्ही तेथे चांदीचे भांडे ठेवलेत. याचा अर्थ काय?''