आशा आणि समीर 1
त्याचे नाव होतें समीर. समीर म्हणजे वारा. वा-याप्रमाणेच समीरची वृत्ती होती. लहानपणापासून तो जरा आडमुठाच. सुधें ऐकायचा नाही. सुधे करायचा नाही. मुलांमध्ये भांडेल, मारामारी करील, घरांवर चढेल, धावेल, कौले फुटायची. लोक तक्रार करायचे, आईबाप रागवायचे. परंतु समीर का कोणाचे ऐकणार होता? बाल्य संपले, तारुण्य आले. वा-याला माळ घालायला कोण तयार होणार? समीरचा भरवसा काय? तो दिसे सुंदर. चेह-यावर एक प्रकारची विश्वविजयी वृत्ति. परंतु घर ना दार. नोकरी ना चाकरी. लहर लागली तर चांगले काम करी, भरपूर मजुरी मिळवी. लहर लागली तर वाचीत बसेल परंतु तो केवळ पुस्तकी ज्ञानाचा भोक्ता नव्हता. हे विश्व म्हणजे त्याची विराट शाळा होती.
समीरवर एका मुलीचे प्रेम होते, वा-याची आपल्या प्रेमाने मोट बांधायला ती उभी राहिली.
''कशाला त्याचा ध्यास घेतेस? सारे त्याला नावे ठेवतात,'' शेजारणी पाजारणी आशाला म्हणत.
''तो काय वाईट आहे?'' ती म्हणे.
''तुला तो फसवील. त्याचा का भरवसा आहे? गेला सोडून तर तू कोठे जाशील? त्याची चंचल वृत्ति,'' मैत्रीणी म्हणत.
''त्याच्या चंचलपणातहि मधुरता आहे, तेज आहे. ठरीव चाकोरीतून जाणा-या जीवनात तरी काय मौज? वारा सर्वत्र नाचतो म्हणून त्याला का आपण वाईट म्हणू? उलट तो त्रिभुवनाला प्रदक्षिणा घालतो. तो घरकुल मांडीत नाही म्हणून तो पवित्रच वाटतो,'' आशा म्हणे.
''परंतु तुला संसार करायचा आहे ना? समीरने तुला सोडून इतरांभोवती प्रदक्षिणा घातल्या तर तुला आवडेल?''
''मला काही समजत नाही. समीर मला आवडतो. तो माझ्या जीवनाचा प्राण आहे. तो कसाहि असो. माझ्या भावनेने त्याच्याकडे बघा. तो तुम्हांला त्रिभुवन-सुंदर वाटेल,'' आशा उचंबळून म्हणे.
सर्वांचे म्हणणे दूर सारून आशेने समीरला वरले. एका लहान झोपडीत दोघे राहू लागली. थोडे दिवस गले. आणि एके दिवशी समीर नाहिसा झाला. आठवडा गेला, महिना गेला, वर्ष गेले. समीरचा पत्ता नाही!
''तुला आम्ही सांगितले होते. बस आता रडत. अविवेकाचा हाच परिणाम,'' बायका म्हणत.
''आशा, पुन्हा लग्न कर, समीरशी लग्न ते का लग्न? सा-या मुलखाचा भटक्या तो. फसलीस. तरुणांना का तोटा आहे? सोन्यासारखे आयुष्य, त्याचे मातेरे नको करूस. ऐक आशा,'' मैत्रिणी म्हणत.