मोठी गोष्ट 2
''सांगेन. मला एकटयाला मिळून काय उपयोग? सर्वच अनाथांना अशा डब्या द्या. मी त्यांना तुमच्याकडे पाठवीन.''
''बरं पाठव. आणखी काय हवे?''
''कपडे.''
''हे घे गाठोडे. यातून मिळत जाईल. परंतु उधळपट्टी नको करूस. दोन अगोदर ते फाटले म्हणजे आणखी माग. सोसासोसाने, ऐट करावी म्हणून मागशील तर गाठोडे पुढे देतनासे होईल. बरं का. तू आहेसच शहाणा.''
''मी तसे करीन. आणि जो कोणी उघडा गरीब भेटेल त्याला तुमचा पत्ता सांगेन.''
''बरे हो. पाठव. कोणी दु:खी कष्टी नका राहू. आणखी काय हवे?''
''ज्ञान. मला पुस्तके हवीत. सारे हवे.''
''ही घे पेटी. हिच्यातून पुस्तके मिळतील. चित्रांची, नाना भाषांची. हिंदुस्थानातील सर्व भाषांची यात आहेत. परंतु लिपी एकच नागरी. नागर लिपीत लिहिलेलीच बंगाली, गुजराथी, तामीळ, तेलगू, कन्नड वगैरे.''
''छान. मी पटपट शिकेन. आणि यात दुर्बीण आहे?''
''हो. या पेटींतून प्रयोगाचे सामानही मिळेल. दुर्बिणीने तारे बघ. हे विश्व किती मोठे आहे ते शीक. पेटीतून शास्त्राची पुस्तके मिळतील. आणि प्रयोगाचे सामानही मिळेल. तू लहानशी प्रयोगशाळा कर. स्वतंत्र भारतात आता विज्ञान हवे. गावोगावी प्रयोगालये हवीत. तू शहाणा हो.''
''मी आता जातो. मी शिकेन. नवहिंद बनवीन.''