* शहाणा झालेला राजपुत्र 3
खुशमस्क-या राजपुत्राकडे गेला. पहारेक-यांनी त्याला हटकले. तो म्हणाला, ''मी येथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे.''
नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.
''पाठवा त्याला'' राजपुत्र म्हणाला.
तो खुशमस्क-या आला. राजपुत्राची तो करमणूक करू लागला. तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहिणही आली. थोडयावेळानें खुशमस्क-या जायला निघाला.
''येत जा'' राजपुत्र म्हणाला.
''राजाने येऊ दिलें तर'' तो म्हणाला.
खुशमस्क-या राजाकडे गेला व म्हणाला, ''राजा, राजा, त्या राजपुत्राची पत्नी फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा.''
''ठीक आहे'' राजा म्हणाला.
दुस-या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडलें. राजपुत्र आला, आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला, ''तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो.''
''ती माझी बहिण.''
''ती माझी राणी होऊ दे.''
''मी तिला विचारीन.''
''कळवा मला काय ते.''
याने बहिणीला सारी हकीगत सांगितली. ती म्हणाली, ''राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही.''
राजपुत्रानें राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्क-या आला.
''काय उपाय?'' राजाने विचारले.
खुशमस्क-यानें सुचविले, ''त्याला म्हणावे तुझी बहीण तरी दे. नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधारी दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो. नाही तर डोके उडवण्यात येईल.''