* शहाणा झालेला राजपुत्र 5
राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, ''दादा, का दु:खी?'' राजपुत्राने सारी कथा सांगितली.
''रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा आणि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाही. परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा की माझी राख माझ्या घरी पाठवा.''
राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्या घरी द्या असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पहात होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नि देण्यात आला. पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठवण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला.
त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदिला, ''महाराज, या राखेत शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या.''
सर्प म्हणाला, ''हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल.'' शेष म्हणाला.
एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले नि तो निघून गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला, ''दादा जा व राजाला सांग की त्यांच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्क-याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या.''
राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाडयासमोर ही गर्दी. राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्क-यास बोलावले व सांगितले, ''अरे, माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे.''
''मी कसा जाऊ?''
''या राजपुत्राला पाठविले त्याच मार्गाने तूहि जा.''
लोकांनी टाळया पिटल्या. दुष्टाची बरी जिरली, कोण म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाडयात आला. भावंडांना म्हणाला, ''हा राजा लहरी दिसतो, वेडा दिसतो. येथे राहण्यात अर्थ नाही. चला आपण जाऊ.''
रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फराळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला, 'दादा मला निरोप दे. मी जातो.'
''मला कंटाळलास?''