खंडित आत्मा 2
वीरा उद्योगहीन माणूस. ताडीचा वेडा. कोठे नाटक, तमाशा असला म्हणजे जायचा. सरकस आली, रामलीला आली तर पहिल्या रांगेत जाऊन बसेल. लोकांना आश्चर्य वाटे की याची चैन चालते तरी कशी. पत्नीच्या श्रमांतून नि अश्रूंतून ती चैन फुलत होती.
नीलम मडके घेऊन आली. वीराने पाहिले. वादळ होणार नीलमने ओळखले.
''इतका वेळ होतीस कुठे? ही पोर पाण्यासाठी मरत आहे. आणि तू विहिरीवर गप्पा मारीत बसलीस? घरात पाण्याचा टाक नाही. आम्ही मेलो तरी तुला काय पर्वा?'' तो बोलतच होता.
नीलम शांत होती. तिने चिनीला पाणी दिले. ती पोर गेली पुन्हा खेळायला. वीराला तिने जेवण वाढले. आज शेजारच्या गावात यात्रा होती. त्याच्याजवळ पैसे नव्हते. चिनीच्या अंगावर फाटके कपडे होते.
वीरा म्हणाला,
''थोडे पैसे दे. चिनीच्या अंगावर नुसत्या चिंध्या. यात्रेतून नवीन कपडे आणीन.''
''चिनीचे कपडे मी शिवीन.'' ती म्हणाली.
वीरा रागावला. इतक्यांत चिनी रडत येऊन म्हणाली.
''बाबा, मला नवीन आणा परकर पोलकं. आणाल ना?''
''ही पोर रडते आहे. दे ना चार रुपये. तुला का पोरीच्या डोळयांतील पाणी दिसत नाही?''
नीलमने चार रुपये काढून त्याला दिले. चिनी पित्याबरोबर जायला निघाली. ती रडू लागली. नीलम पतीला म्हणाली,
''घरीच रहा ना. मी चुनखडीचे दगड आणायला जात आहे.''
टोपली घेऊन नीलम गेली. आणि वीरा कोठला घरी राहयला? तोही पसार झाला. चिनी रडत होती. शेवटी बाहुलीशी खेळत बसली. आणि तेथे झोपली.