Get it on Google Play
Download on the App Store

अभिजित कुंटे

अभिजित कुंटे

 महाराष्ट्रातील आघाडीचे बुद्धिबळपटु

आंतरराष्ट्रीय स्तरावर सांघिक किंवा वैयक्तिक क्रिडा-प्रकारात भारताने सातत्याने वर्चस्व मिळवले आहे, असे बोटावर मोजण्याइतके खेळ आहेत. त्यांतील एक खेळ म्हणजे बुद्धिबळ. भारतीय परंपरांत ज्याची मुळे सापडतात असा हा खेळ. या खेळात गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर असलेला खेळाडू म्हणजे पुण्याचा अभिजित कुंटे होय.

भारताच्या विश्र्वनाथन आनंदने या खेळात जागतिक स्तरावर सातत्याने आघाडीवर राहून एक आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या प्रेरणेतून भारतातील अनेक राज्यांतील खेळाडू बुद्धिबळाकडे आकर्षित झाले. महाराष्ट्रात प्रवीण ठिपसे यांनी प्रथम आंतरराष्ट्रीय ग्रॅडमास्टर हा उच्चस्तरीय बहुमान मिळवला, व त्यापाठोपाठ अभिजित कुंटे यांनी वयाच्या २३ व्या वर्षी, २००० साली ’ग्रॅडमास्टर’ हा किताब प्राप्त केला. (ग्रॅडमास्टर - हा किताब आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेच्या (फिडे) वतीने दिला जातो. हा किताब मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्य राखून, विशिष्ट मानंकन गुण मिळावावे लागतात.) अभिजित कुंटे हेभारताचे ४ थे व महाराष्ट्रातील २ रे ग्रॅडमास्टर आहेत.

पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अभिजित कुंटे यांनी लौकिक शिक्षणातही ’मॅनेजमेंट सायन्स’ या अभ्यासक्रमात विशेष श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. सध्या ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

वयाच्या ११ व्या वर्षापासून अभिजित यांनी बुद्धिबळाच्या पटावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यास सुरुवात केली.

बारा वर्षांखालील गटाचे एक राष्ट्रीय विजेतेपद,

चौदा वर्षांखालील गटाचे  राष्ट्रीय विजेतेपद दोन वेळा,

सोळा वर्षांखालील गटाचे एक राष्ट्रीय विजेतेपद -

अशी अनेक विजेतीपदे १९८८ ते १९९३ या काळात अभिजित यांनी मिळवली. त्याचबरोबर वीस वर्षांखालील गटाचे राष्ट्रीय विजेतेपद सलग तीन वेळा (१९९५ ते १९९७) मिळवण्याचा राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावावर आहे. राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ या सर्वोच्च स्पर्धेचे विजेतेपदही कुंटे यांनी आत्तापर्यंत दोन वेळा (१९९७ व २०००) मिळवले आहे. त्यांनी ’इंटरनॅशनल मास्टर’ हा किताब १९९७ मध्येच मिळवला होता. आशियाई कुमार बुद्धिबळ स्पर्धेत (१९९७) सुवर्णपदक, कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत २००० मध्ये रौप्य व २००३ मध्ये कास्य पदक; ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोच्च स्थान (२००३) कॅनडातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २ वेळा प्रथम क्रमांक, कालिकत येथील ग्रॅडमास्टर स्पर्धेतील विजेतेपद (१९९८) असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशही अभिजित कुंटे यांनी आत्तापर्यंत प्राप्त केले आहे. गेली अनेक वर्षे कुंटे यांचे एलो रेटिंग (आंतरराष्ट्रीय मानांकन गुण) सातत्याने २५५० च्या आसपास राहिले आहे.

अभिजित यांची बहीण मृणालिनी कुंटे यादेखील प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहेत. सुरुवातीला मृणालिनी यांचा सराव होण्यासाठीच त्यांच्या आई-वडिलांनी अभिजितला बुद्धिबळ खेळण्याची सवय लावली. पुण्यातील ’फडके मार्गदर्शन केंद्रात’ अभिजित यांनी बुद्धिबळाचे धडे घेतले. अभिजित यांची कारकीर्द घडण्यामध्ये त्यांची आई-वडील-बहीण यांच्यासह मोहन फडके व इंटरनॅशनल मास्टर अरुण वैद्य यांचा मोठा वाटा आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अत्याधुनिक साधने (संगणक, लॅपटॉप, इंटरनेट... इ.) नसतानाही कुंटे यांनी यश मिळवले हे विशेष. पुस्तकातील सैद्धांतिक माहितीवरून पुस्तकी चाली खेळण्यपेक्षा, अनियमित चाली रचणे, नैसर्गिक खेळाला महत्त्व देऊन उत्स्फूर्त खेळावर भर देणे - या पद्धतीने बुद्धिबळ खेळण्यावर कुंटे अधिक भर देतात.

महाराष्ट्रात बुद्धिबळाबाबत प्रेरणा, औत्सुक्य व पार्श्र्वभूमी निर्माण करणार्‍या अभिजित कुंटे यांना राज्य शासनाने ’श्री शिवछत्रपती पुरस्कार’ (१९९८-९९) देऊन गौरवले आहे. बुद्धिबळ खेळाचा विचार करता अभिजित यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उच्चस्थानावर फडकवत ठेवला आहे.

गेली अनेक वर्षे अभिजित जागतिक स्तरावर पहिल्या १५० बुद्धिबळपटूंत स्थान टिकवून आहेत. २६०० फिडे मानंकन गुण मिळवून ’सुपर ग्रॅडमास्टर’ हा किताब प्राप्त करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, व त्या दृष्टीने ते वाटचाल करत आहेत. हे यश प्राप्त केल्यानंतर समाजकारणात व राजकारणात सहभागी होऊन सामन्य माणसासाठी विधायक कार्य करण्याचेही त्यांनी मनापासून ठरवले आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे