किशोरी आमोणकर
`ईश्वराच्या समीप जाण्यासाठी सर्वाधिक साहाय्यभूत ठरणारी कला' म्हणून संगीताची भक्तिभावाने आराधना करणार्या `गानसरस्वती'!
ज्यांच्या शास्त्रीय गायनाने रंगमंचाचा गाभारा बनतो आणि सभागृहाचे मंदिरात रूपांतर होते, अशी उच्च दर्जाची सांगीतिक क्षमता असणार्या गायिका म्हणजे किशोरीताई आमोणकर होत. गेली सुमारे ५०-५५ वर्षे किशोरीताईंचा स्वरविचार व त्यांनी अभिव्यक्त केलेले स्वरसौंदर्य यांचा आस्वाद केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, संपूर्ण भारतातील रसिक घेत आहेत. जयपूर -अत्रौली घराण्याच्या श्रेष्ठ गायिका म्हणून त्या आपणांस सुपरिचित आहेत.
१९३१ मध्ये तत्कालीन ज्येष्ठ गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मोगुबाईंचे (माईंचे) संस्कार आणि गोव्याजवळच्या कुर्डी येथील निसर्गरम्यता या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. शास्त्रीय संगीताचे ज्ञान, त्यातील विचार व सौंदर्य, साधनास्वरूप रियाज, गुरू-शिष्य नाते, मैफिलीतील नेटके सादरीकरण आणि काही रागांबद्दलची सविस्तर शिकवण... अशा अनेक बाबतीतील प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांना माईंकडून मिळत गेले. ``संगीत आणि स्वयंपाक यांतील बारकावे व शिस्त माईंमुळे माझ्यात उतरली आहे,'' असे किशोरीताई सांगतात. कुर्डीचा निसर्ग त्यांच्या रसिक मनाला आनंद देणारा ठरला आणि त्यातून त्यांच्या प्रतिभेचा विकास झाला, की जो आपण आज त्यांच्या गायनातून अनुभवतो.
जयपूर- अत्रौली घराण्याची गायकी अवघड मानली जाते. पण घराण्याची शिस्त व चौकट अबाधित राखून ती गायकी अधिक सोपी करून रसिकांसमोर मांडण्याचे श्रेय किशोरीताईंकडे जाते. त्या श्री राघवेंद्र स्वामीच्या भक्त आहेत. गायनातून ठायी-ठायी प्रकट होणारा भक्तिभाव हे त्यांच्या आविष्काराचे प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल. किशोरीताई शास्त्रीय संगीताच्या शास्त्रशुद्धतेचा, पावित्र्याचा आग्रह धरतात. हा आग्रह त्यांच्या स्वत:च्या गायनातही ठळकपणे दिसतो. स्वराच्या अंतरंगापर्यंत जाणे, सूक्ष्मातिसूक्ष्मापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या गायकीचे बलस्थान होय.
साधना, अभ्यास व चिंतन या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी आपली गायकी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. संगीत शास्त्र, स्वर, ताल, लय, विविध राग, श्रुती, आरोह-अवरोह इत्यादी संज्ञा-संकल्पनांचा किशोरीताईंचा सखोल अभ्यास आहे. सादरीकरण करताना त्या केवळ तो राग - ते भजन - ते गीत गात नसतात, तर त्यांचा त्यामागचा संपूर्ण अभ्यास प्रकट होत असतो. `त्या' स्वरांची शुद्धता आणि त्यांच्यामध्ये दडलेल्या भावभावनांचे नेमके व परिपूर्ण प्रकटीकरण ही किशोरीताईंच्या गायनाची खासियत आहे. त्यांचा गाढा अभ्यास त्यांच्या गायनाबरोबरच लेखनातून व बोलण्यातूनही व्यक्त होतो. त्या उत्तम वक्त्या आहेत. संगीतातील `रससिद्धांत' मांडणार्या वक्त्या म्हणून त्या भारतभर प्रसिद्ध आहेत. आपल्या `प्रकृती' ला काय अनुरूप ठरेल याचे खास चिंतन करून स्वरांतील सौंदर्य व भाव अचूकतेने, समर्थतेने पेलणारी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण अशी गायकी निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी काही नव्या रागांची बांधणीही केली आहे.
त्यांची मैफिल हा एक समृद्ध अनुभव असतो. ती एक पूजा असते. आविष्कार करताना त्यांचे रसिक मन, त्यांच्यामधील कुशल चित्रकार, त्यांच्यामधील साधक, उपासक आणि अभ्यासक या सर्वांची बेरीज होते आणि रसिकांना एक परिपूर्ण अनुभव मिळतो. स्वरमंडलातून व तंबोर्यातून येणारे सूर ,`षड्ज' लावताना त्यांचा जणू समाधिस्थ झालेला चेहरा हे प्रेक्षणीय व श्रवणीय असते. जोडीला त्यांचे आखीव-रेखीव सादरीकरण, रागाची नेटकी - शिस्तबद्ध मांडणी हे कमालीचे नियोजन तर असतेच. मैफिलीत त्या स्वत: ईश्वरोपासना करत असतातच, शिवाय रसिकांनाही त्या एक पवित्र, आध्यात्मिक अनुभव देतात. वैयक्तिक संवेदनांना वैश्विकतेकडे नेण्याचे असे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या कलेत आहे.
`शिष्य हे गुरूकडे लीन हवेतच, पण शिष्यानेही स्वप्रतिभा विकसित करावी', असे मत त्या मांडतात. एक शिष्या व गुरू म्हणूनही त्यांनी या विचाराला प्रत्यक्षात आणले. माणिक भिडे, पद्मा तळवलकर, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर - टिकेकर, अरूण द्रविड... ही त्यांच्या शिष्यांची यादी पाहिल्यास त्या विचाराला अधिक पुष्टी मिळते. त्यांची नात तेजश्री आमोणकर यांच्यामध्ये त्यांची गायकी पेलण्याची क्षमता आहे असे जाणकार रसिक म्हणतात. त्यांनी गायलेला हंसध्वनी (गणपत विघ्न हरण...) ऐकून किंवा त्यांचं `सहेला... रे...' ऐकून रसिक चिंब होतोच, शिवाय `हे शाम सुंदर' सारखी गीते; खास त्यांच्या शैलीतील `माझे माहेर पंढरी', `जनी जाय पाणियासी'.... ही सारी गीतं रसिकाला रससिद्ध अनुभव देतात.
या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचे गुरूबंधू, संगीत तज्ज्ञ वामनराव देशपांडे यांची, `किशोरीताई या २० व्या शतकातील श्रेष्ठतम गायिका आहेत', ही प्रतिक्रिया यथार्थ ठरते. ज्येष्ठ संगीत समीक्षक दत्ता मारूलकर यांच्या `गानसरस्वती' या पुस्तकातून आपण या श्रेष्ठ गायिकेचे जीवन अनुभवू शकतो.
संगीतातील शास्त्रशुद्धतेचा व पावित्र्याचा किशोरीताईंचा स्वत:चा सक्रिय आग्रह तर असतोच... पण या क्षेत्रातील इतरांकडूनही त्यांची याबाबत अपेक्षा असते. `अशी' अपेक्षा व्यक्त करण्याइतका या क्षेत्रातील त्यांचा अधिकार निश्चित मोठा आहे. हा अधिकार लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रपती गौरव पदक, पद्मभूषण व पद्मविभूषण असे पुरस्कार बहाल केले.
रसिक, साधक, उपासक व अभ्यासक किशोरीताई मैफिलीत गात आहेत आणि रसिकही त्या अलौकिक विश्वात जाऊन पोहोचलेले आहेत हा नेहमीचाच अनुभव आहे.
`अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।।
असे म्हणत त्या स्वत:ही `त्या' रंगाशी एकरूप झालेल्या असतात, आणि रसिकही त्या ब्रह्मरंगात केव्हाचेच न्हाऊन निघालेले असतात.