Get it on Google Play
Download on the App Store

बाबा आमटे

बाबा आमटे

सर्वसामान्य माणूस दहा जन्मांतही जेवढे काम करू शकणार नाही, एवढे - व्याप्ती, उंची व खोली या सर्व दृष्टिकोनांतून - ‘भव्य’ कार्य उभे करणारे श्रेष्ठतम समाजसेवक!

कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना करणार्‍या मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. १९३४ साली बी.ए. व १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी त्यांनी संपादन केली. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रमही पूर्ण केला.

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली, आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्र्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. या अंतर्गत त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनाततब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

असाध्य गोष्टींना स्वत:हून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. त्या अंत:प्रेरणेतून १९५१ साली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात त्यांनी ‘आनंदवना’ची स्थापना केली. मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा-सुश्रुषाच करण्याचीच नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदीकुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. (आजही ही केंद्रे कार्यरत आहेत.) ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’, या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा ‘देखणा प्रत्यय’ या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण - संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणार्‍या नद्या-नाले, जंगली श्र्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवार्‍याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.

भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवित आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.

पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, रेमन मॅगसेसे पुरस्कार, टेंपल्टन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार, जे. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्करांनी बाबांना गौरविण्यात आले.(प्रकाश व मंदा आमटेंनाही ऑगस्ट, २००८ मध्ये मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.) या महान जगावेगळ्या विराग्याने स्वत:ला मिळालेल्या पुरस्कारांची सर्व रक्कम (कोटयवधी रुपये) फक्त समाजकार्यासाठीच वापरली.

६ कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन याआधारे लावलेल्या रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताई यांचाही त्याच तोडीचा वाटाआहे. साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्‍या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.

बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कार्यरत असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. त्यांच्या विधायक कार्याला सौंदर्याचे परिमाण लाभले होते ते त्यांच्या प्रतिभेमुळेच! 'Our work is a Poem in action', असे स्वत: बाबा म्हणत असत.  

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्र्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प कमालीचे यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, उर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहत असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली.

समाजाने नाकारलेल्या उपेक्षितांना मोठ्या अंत:करणाने, मायेने आपल्या पंखाखाली घेऊन,त्यांना  नवसंजीवनी देणारा हा महान कर्मयोगी  फेब्रुवारी, २००८ मध्ये अनंतात विलीन झाला. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश, विकास आमटे व त्यांचे परिवार) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने, सातत्याने कार्यरत आहेत.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे