शाहीर साबळे
स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कलाकार म्हणून अमूल्य योगदान देणारे देशभक्त आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’तून मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे महाराष्ट्र शाहीर!
गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा।। हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे शाहीर कृष्णराव साबळे. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतोऽऽ’ या ओळी ऐकताना त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रत्यय येतो. कृष्णराव केवळ मनोरंजनातून प्रबोधन करणारे शाहीर नाहीत, तर उत्तम कवी-गीतकार-संगीतकार, कुशल ढोलकीवादक, उत्तम अभिनेते-दिग्दर्शक, उत्कृष्ट व्यवस्थापक व संघटक, आणि उच्च प्रतीचे गायक आहेत. ‘मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं!’ असे पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते.
शाहीर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी गावचे, जन्म १९२३ चा. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले. शालेय शिक्षणासाठी अंमळनेरला असताना साने गुरुजींशी संपर्क आला. तेथे त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार झाले.
शाहीर शंकरराव निकम हे त्यांचे गुरू तर शाहीर मुचाटे त्यांचे आदर्श! साबळेंनी लोकनाट्यात थोडासा बदल करून ‘मुक्तनाट्य’ निर्माण केले. म्हणूनच त्यांना ‘मराठी मुक्तनाट्याचे आद्य प्रवर्तक’ म्हणतात. महाराष्ट्राच्या अनेक सामाजिक व राजकीय घडामोडींत एक कलावंत-कार्यकर्ता म्हणून शाहीर साबळेंची कामगिरी नेहमीच मोलाची राहिली आहे. १९४२ ची चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ, लोकगीतांचे पुनरुज्जीवन अशा अनेक विधायक कामांतही त्यांचा मोठा वाटा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्र्वभूमी तयार करण्यात त्यांची स्वत:ची अन् त्यांच्या ‘आंधळं दळतंय’ या प्रहसनाची भूमिका मध्यवर्ती होती.
शाहीरांनी एकूण १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या त्यांच्या नावीन्यपूर्ण, सर्जनशील कार्यक्रमातून; अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीतं... इत्यादींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. महाराष्ट्राची लोकधारा ‘यमराज्यात एक रात्र’ हे त्यांचे १९६० मध्ये बंदिस्त नाट्यगृहात सादर झालेले पहिले मराठी मुक्तनाट्य होय. ‘मुंबावतीची लावणी’, कार्ल मार्क्सचे साम्यवादी तत्त्वज्ञान सांगणारा ‘आधुनिक मानवाची कहाणी’ हा पोवाडा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती होत. शाहीर साबळेंनीराज्याच्या कडेकपार्यांतून लोकगीते गोळा करून त्यांचे पुनरुज्जीवन केले. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील एकमेवाद्वितीय प्रयोगही त्यांनी केला.
१९५४-५५ मध्ये एच.एम.व्ही. चे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत, पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर, अ.भा. मराठी शाहीरी परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच, अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर असे अनेक बहुमान साबळे यांच्या नावावर आहेत. शासनाचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार व संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे.
शाहीरीचे प्रशिक्षण देणार्या शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कृष्णराव आजही कार्यरत आहेत. महाराष्ट्रशाहीर साबळे यांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्राच्या लोकधारेचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून - देवदत्त साबळे, चारुशीला साबळे, केदार शिंदे (नातू) - अखंडपणे वाहत आहे.
चिंतामण त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)
मराठी साहित्यविश्वाला `नक्षत्रांचे देणे' देणारे प्रतिभासंपन्न कवी!
वेंगुर्ला तालुक्यातील ‘बागलांची राई’ या ठिकाणी चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. एस.एस.सी. पर्यंतच शिक्षण होऊ शकले. ते बुद्धीने अत्यंत तल्लख पण थोड्या विक्षिप्त स्वभावाचे होते. कोकणात नित्यनेमाने चवीने चघळल्या जाणार्या भुताखेतांच्या कथा, एकूणच कोकणातील निसर्ग, गूढरम्यता, माणसांच्या मनाचा कसून शोध यांकडे त्यांचे लिखाण जास्त झुके.
साधारणपणे १९५० मध्ये त्यांनी लेखनास सुरुवात केली. सत्यकथेच्या १९५४ च्या फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘शून्य शृंगारते’ या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर विंदा करंदीकर व पाडगावकरांच्या ओळखीने मुंबईला १९५९ साली ते आले. आकाशवाणीवर र्स्टों आर्टिस्ट म्हणून ते नोकरीस लागले. पण काही कारणांमुळे १९६१ मध्ये त्यांना नोकरी सोडावी लागली.
खानोलकर हे अतिशय प्रतिभासंपन्न लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ लक्षात घेतला, तर त्यांच्या लेखनाचा वेग किती प्रचंड होता हे सहज लक्षात येईल. तरीही त्यांच्यालेखनातील वेधकता व गुणवत्ता वादातीत आहे.
घरचे दारिद्रय, आप्तस्वकीयांचा मृत्यू, उपेक्षा, त्यांच्या स्वभावामुळे होत जाणारे गैरसमज, घरची -दारची आजारपणे, नियतीने कधी कधी केलेली कुतरओढ या सगळ्या पसार्यात अडकूनही खानोलकरांच्या लिखाणात कधी खंड पडला नाही. त्यांच्या सगळ्याच यशस्वी लेखनाला एक प्रकारचा पारलौकिकाचा संजीवक स्पर्श झालेला आढळतो.
काही लेखन करायचे असले की, खानोलकर जणू कसल्यातरी भावसमाधीत जात आणि एका विलक्षण अवस्थेत देहभान विसरून लिहीत राहत, झपाटल्यासारखे... आणि ती भावसमाधी उतरली, की त्यांचे लेखन थांबे. मग त्या अवस्थेत जे काही लेखन होई, ते स्वयंभू, स्वयंपूर्ण अशी अनुभूती देणारे असे.
त्यांच्या कवितेने सौंदर्यवादी जाणिवेकडून अस्तित्ववादी जाणिवेकडे केलेली प्रगल्भ वाटचाल, त्यांच्या कथांमधून प्रकट झालेले जीवनाच्या शोकात्मतेचे विविधरूपी आकार, माणूस व विश्व यांच्यातील अनेकविध ताण, काम, प्रेम, द्वेष, हिंसा, सूड, निष्ठा, मत्सर इ. वृत्तीप्रवृत्तींनी भरलेले त्यांच्या कादंबरीमधले गुंतागुंतीचे जग - या सार्यांमुळे खानोलकरांचे लेखन वाचकांना व समीक्षकांना गूढ आव्हान देत राहते. विश्वाच्या अफाट पसार्यात आणि नियतीच्या निर्विकार दृष्टीसमोर माणूस अगदी नगण्य, शून्य आहे, हा बोध त्यांच्या सर्वच लेखनातून येतो.
अनाकलनीय, अतर्क्य दैवी शक्ती, पापपुण्याच्या संकल्पना, धार्मिक श्रद्धा, माणसाला कोणत्याही पातळीवर नेऊ शकणारी काम प्रेरणा, निसर्गाचे कोमल तसेच उग्रकठोर रूप, वासनांचे विखारी फुत्कार ही सूत्रे खानोलकरांच्या आशयबंधातून फिरून फिरून वेगवेगळे आकार घेताना दिसतात. या आशय सूत्रांची सामर्थ्याने व सहज अभिव्यक्ती करू शकणारी प्रतिमांकित भाषाशैली हे त्यांना लाभलेले वरदानच होते.
त्यांचा ‘जोगवा’ हा पहिला काव्यसंग्रह १९५९ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९६२ मध्ये ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या व्याकूळ, दु:खविव्हल अवस्थेतल्या कविता जास्त आढळतात. स्मृतिजन्य व्याकुळता हा त्यांच्या पूर्वार्धातील निर्मितीचा ठळकपणे जाणवणारा विशेष वाटतो. इतर समकालीन कवींप्रमाणे तपशीलवार प्रेयसी चित्रण त्यांच्या कवितेत येत नाही. प्रेयसीचे वर्णन करता करताच त्यांना दु:खाची जाणीव इतक्या तीव्रतेने होते, की पुढची कविता त्या अनामिक दु:खाचा अविष्कार होते.
जराच फिरली किनखाबीची सुई, जुईचा उसवित शेला,
आणि ठणकला गतस्मृतीचा , काळोखाने कापूर पेला -
अशी त्यांची वेदना अधिकाधिक तीव्र होत जाते.
त्यामानाने १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहात ते जास्त प्रसन्न वाटतात. आपल्या वेदनाकोशातून बाहेर आल्यासारखे वाटतात. यातील कविता संवादात्मक व नाट्यनिष्ठ आहेत. यातली एक नितांत सुंदर कविता-‘आड येते रीत’.
‘नाही कशी म्हणू तुला पहाटमाणगी, परि घालायचे आहे तुळशीस पाणी
नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परि सारे हलक्याने आड येते रीत...
या कवितेमधे पती-पत्नीमधील सूचक शृंगार हळुवारपणे व्यक्त झालेला आहे. यातील शृंगारभाव उत्कट असला तरी त्यातील कलात्मक संयम त्यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देतो.
आरती प्रभूंच्या संपूर्ण कवितेला सतत निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेली आढळते. नेमके आणि नीटस शब्द हे त्यांच्या निसर्गकवितेचे वैशिष्ट्य.
हिरव्याशा गवतात हळदिवी फुले, हलकेच केसरात दूध भरु आले,
उभ्या उभ्या शेतांमधे सर कोसळली, केवड्याची सोनकडा गंधे ओथंबली ..
अशा सुंदर रंग-गंध भरल्या शब्दांनी, प्रतिमांनी त्यांची निसर्गकविता नटलेली आहे.
कोणताही लेखक हा कवितेमधे आत्मप्रकटीकरण करतो. कादंबरीमधे मात्र लेखक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने आत्मप्रकटीकरण करण्याची संधी घेतो. म्हणून तर त्यांना गद्यलेखनाकडे वळावे लागले. माणसामधील व समाजामधील विकृतीचे चित्रण जे कवितेला कदाचित पेलले नसते, ते त्यांनी कादंबरी, नाटक व कथांमधून मांडले. त्यांनी उसवलेल्या माणसांचे विश्र्व आणि त्यांच्या आदिम वासना, प्रेरणांचा शोध आपल्या जाज्वल्य लेखणीद्वारे घेतला.
१९६६ मधे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगभूमीवर आले. झाडे नग्न झाली, पाठमोरी या कथांमुळे ते लेखक म्हणूनही प्रतिष्ठित झाले. त्यांच्या चानी, कोंडूरा या कादंबरींवर चित्रपटही निघाले.
नियतीने त्यांना पुरे जीवन जगू दिले नाही. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली, अन्यथा मराठी साहित्यात आणखी काही मोलाची भर त्यांनी निश्चितपणे घातली असती.
खानोलकरांची प्रतिमांकित भाषा ही मराठी वाङ्मयाला मिळालेली एक अमोल देणगी आहे. अशा प्रकारची गद्य काव्यसदृश भाषा मराठी कादंबरी, नाटकांमधून दुर्मीळ होत चालली आहे. त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य आणि लौकिक अपयशाची कारणे पुन: पुन्हा शोधावी असे आव्हान ज्यांच्या कलाकृतींनी वारंवार समीक्षकांपुढे ठेवले अशा अनोख्या प्रवृत्तीचा कलावंत म्हणून खानोलकर वेगळे व महत्त्वाचे ठरतात.