Get it on Google Play
Download on the App Store

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली,  कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.  

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे